ठाकरे बंधूच्या युतीची गाडी वसई विरारमध्ये अवघड वळणावर!
- Navnath Yewale
- Dec 25, 2025
- 2 min read

मुंबई: एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांनी नुकतीच युतीची घोषणा केली आहे. त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बहुजन विकास आघाडीची वसई विरार माहापालिका निवडणुकीसाठी झालेली युती तुटली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर आणि नेते शिरीष चव्हाण यांनी ही माहिती दिली.
जागा वाटप आणि चिन्हाच्या मुद्यावर या दोन्ही पक्षांचे एकमत न झाल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याचवेळी बहुजन विकास आघाडी मनसेसोबत युती करण्यास तयार असल्याची महिती आहे. पण ठाकरे बंधू एकत्र आल्याने मनसेची वसई विरारमध्ये पंचायत झाली आहे. इथे आता मनसे काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मशाल चिन्हावरच लढणार असल्याचे सांगत 25 जागांचा आग्रह धरला. तर ठाकूर यांनी 8 जागा देऊ, असे सांगत चिन्ह समानच असले पाहिजे, अशी भूमिका मांडली. हा प्रस्ताव ठाकरेंच्या नेत्यांनी अमान्य केला आहे. 25 जागांची मागणी मान्य झाली नाही.
निवडणुकीपूर्वी आघाडी झाली असली तर शिट्टी निशाणी घेतली असती. निवडणुका जाहीर झाल्याने ही आघाडी अशक्य असून शिट्टी चिन्ह घेतल्यास मविआचे एबी फॉर्म घ्यावे लागतील, असे स्पष्ट करण्यात आले.
शिट्टी चिन्हावर न लढता मशाल चिन्हावरच लढण्याची पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणार असून सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्याची पक्षाची तयारी आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर आणि शिवसेना नेते शिरीष चव्हाण यांनी दिली. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीसोबत युती करण्यासाठी पहिल्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चर्चेची सुरुवात केली होती. त्यासाठी नेते विलास पोतनीस, अमोल किर्तीकर यांनी ठाकूरांसोबत बैठकही घेतली होती. त्यानंतर स्वत: आमदार मिलिंद नार्वेकर यांनीही विरारमध्ये येऊन ठाकूरांशी चर्चा केली होती. तेव्हा युती होण्याच्या दृष्टीने सकरात्मक चर्चा होत असल्याची माहिती ठाकरे सेना नेत्यांनी दिली होती.
भाजपच्या विरोधात महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघडी सोबत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेत गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक बैठका होऊन आघाडी करण्यावर एकमत होत असतनानाच बुधवारी शिवसेना उद्धव बाहासाहेब ठाकरे पक्षाने चिन्ह आणि सन्मानजनक जागा मिळत नसल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि मनसेची अद्यापही बविआसोबतच लढण्यासंबंधी बोलणी सुरू आहे.
काँग्रेसने 29 जागा मागितल्या असल्या तरी त्यात वाटाघाटी सुरू आहेत. तसेच समान चिन्ह घेण्याचीही काँग्रेसची तयारी आहे. यासंबंधी वरिष्ठांची बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अल्मेडा यांनी दिली.



Comments