तुकाराम मंढे यांचा कारवायांचा धडाका!: सांगोल्यात 37 हजार लिटर भेसळयुक्त दुध जागेवरच ओतलंअजिंक्यराणा दुध संकलन केंद्रावर कारवाई
- Navnath Yewale
- 12 minutes ago
- 1 min read

सोलापूर: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा राज्यभरात कारवायाचा धडका सुरूच आहे. कारवायांच्या धास्तीने भेसळमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या कारवायांचा ‘इफेक्ट’ सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात दिसून आला आहे. तालुक्यातील जवळा येथील एका दुध संकलन केंद्रावर एफडीऐन छापा टाकत तब्बल 37 हजार 532 लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट केलं आहे. नष्ट केलेल्या दुधाची किंमत जवळपास 15 लाख इतकी आहे.
एफडीएच्या माध्यमतून सोलापूर जिल्ह्यात झालेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई मानली जात आहे. या कारवाईमुळे दुग्ध व्यवसायात भेसळ करणार्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.
सांगोला तालुक्यात जवळा येथे ‘अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज’ नावाने मोठं दुध संकलन केंद्र आहे. या केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर दुधात भेसळ केली जात असल्याची गोपनिय माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एफडीएच्या पथकाने या केंद्रावर अचानक छापा टाकला. या छाप्यामध्ये तब्बल 37 हजार 532 लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करण्यात आला. दुधाचा हा आवाढव्य साठा मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचं समोर आल्याने अधिकार्यांनी कोणताही वेळ न घालवता हा संपूर्ण साठा जागेवरच नष्ट केला.
एफडीए च्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या दुधाचे एकूण चार वेगवेगळे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कडक कायदेशीर आणि फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने हे ‘ अजिंक्यराणा दुध संकलन केंद्र’ तातडीने बंद करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. दुग्धजन्य पदार्थांमध्ये किंवा दुधात कोणत्याही प्रकारची भेसळ सहन केली जाणार नाही आणि यापुढेही अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील, असा इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे. तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या भीतीने राज्यभरातील भेसळमाफियांच्या मात्र आता झोपा उडाल्या आहेत.



Comments