दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला; दिल्ली, मुंबईसह ठिकठिकाणी छापेमारी
- Navnath Yewale
- Sep 11
- 1 min read

देशभरात काल उघडकीस आलेल्या मोठ्या दहशतवादी नेटवर्क प्रकरणात पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने आणि केंद्रीय यंत्रणांनी 3 राज्यांमध्ये छापे टाकले. या कारवाईदरम्यान 5 आयएसआयएस दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय यंत्रणेसोबत स्पेशल सेलनं दिल्ली, मुंबई आणि झारखंड या तीन ठिकाणी छापे टाकले. यावेळी तपास करत दिल्लीतून दोन संशयित दहतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची ओळख पटली असून, विशेष म्हणजे तपासात हे दोघेही मुंबईतील रहिवासी असल्याची माहिती आहे.
मुंबईतील त्यांच्या लपण्याचा ठिकाणी छापे टाकण्यात आले. तसेच शस्त्रे आणि आयईडी बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. तर, झारखंडमधील रांची येथून अशर दानिशला अटक करण्यात आली आहे. त्याच्या लपण्याच्या ठिकाणावरून रासायनिक आयईडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
या मोठ्या कारवाईमुळे देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का बसला असून, पुढील तपास दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल आणि केंद्रीय तपास यंत्रणा करत आहेत.
9 सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांना गुप्तचराकडून दहशतवादी आफताबबद्दल माहिती मिळाली. माहितीच्या आधारे कारवाई करत स्पेशल सेलनं छापा टाकला. तसेच आफताबला पकडले. त्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी दानिशची माहिती मिळाली. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी गुप्तचर यंत्रणेसह झारखंडची राजधानी रांची येथे छापा टाकला.
दरम्यान, दानिश आणि आफताबची चौकशी केल्यानंतर इतर 3 दहशतवाद्यांबाबत माहिती मिळाली. नंतर त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं.
या कारवाईमध्ये दहशतवाद्यांकडून पिस्तुल, डिजिटल उपकरणे, हायड्रोक्लोरिक अॅसिड, नायट्रिक अॅसिड, सोडियम बायकार्बोनेट, सल्फर पावडर, पीएच व्हॅल्यू चेकर, बीकर सेट, सेप्टी ग्लोव्हज, रेस्पिकरेटरी मास्क, लॅपटॉप, मोबाईल फोन, सर्किट, मदर बोर्ड जप्त करण्यात आले.



Comments