दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्वाची माहिती समोर,आय 20 मध्ये डॉ. मोहम्मद उमर असल्याचा कयास ; दिल्ली पाठोपाठ, मुंबईत हाय अलर्ट
- Navnath Yewale
- Nov 11
- 2 min read

देशाची राजधानी दिल्लीत काल (10 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटाने हादरून गेली. ऐतिहसिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणार्या एका कारमध्ये सोमवारी सायंकाळी सुमारे 6:52 वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर राजधानीतील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. काल रात्रीपासूनच दिल्ली पोलिस, स्पेशल सेल आणि एनएसजीच्या टीम्स अलर्ट मोडवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी पहाडगंज, दरियागंज, कनॉट प्लेस आणि आसपासाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहिम सुरू केली आहे .
पोलिसांच्या टीम्सनी त्या भागातील जवळपास सर्व लहान -मोठ्या हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस मध्ये सर्च ऑपरेशन चालवले. या दरम्यान प्रत्येक हॉटेलचे रजिस्टर तपासण्यात आले, जेणेकरून मागील 48 तासांत कोणकोणत्या व्यक्तींनी खोली बुक केली होती, हे समजू शकेल. अनेक सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत, जेणेकरून कोणत्याही संशयित व्यक्तीच्या हालचालींचा मागोवा घेता येईल. चौकशीदरम्यान पोलिसांना चार व्यक्तींवर शंका आली आहे. या चौघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप त्यांच्या ओळखीची किंवा अटकेची अधिकृत पुष्टी केलेली नाही.
तपास अधिकार्यांच्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सुमारे 4 वाजता आय- 20 कार दरियागंज मार्केट परिसरातून निघताना दिसली. त्यानंतर ती सुनहेरी मशिदीजवळील पार्किंगमध्ये पोहोचली. सायंकाळी अंदाजे 6.22 वाजता ही कार पार्किंगमधून बाहेर पडून छट्टा रेल चौकात यू-टर्न घेत लोअर सुभाष मार्गाच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये दिसली. यू-टर्न घेतल्यानंतर कार लोअर सुभाष मार्गाकडे जात होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की सायंकाळी 6:52 वाजता स्फोट होण्यापूर्वी सिग्नलजवळ कारचा वेग कमी झाला होता.
दरम्यान, दिल्ली पोलिस सध्या कारच्या संपूर्ण मार्गाचा तपशील गोळा करत असून पुढी कारवाई सुरू आहे.प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट झाले आहे की ही गाडी फरीदाबादहून आली होती. या अनुषंगाने सर्व दिशांनी तपास सुरू आहे. या गाडीचा तपास दिल्ली पोलिसांकडून केला जात असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत.
दिल्ली स्फोट प्रकरणात दोन संशयितांची नावे समोर आली आहे. स्फोटांसाठी वापरलेली आय-20 कार पुलवामातील रहिवासी तारिकला विकली गेली होती. कारच्या चावीवर फरीदाबादमधील एका ऑटो कंपनीचे नाव लिहिलेले आढळले असून, तपास यंत्रणा आता त्या कंपनीपर्यंत पोहोचल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी फरीदाबादच्या सेक्टर-37 परिसरात आहे. ही कंपनी जुन्या म्हणजेच वापरलेल्या (यूज्ड) कारच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करते. सध्या दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल आणि एनआयच्या टीम्स या व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रे तपासत आहेत, जेणेकरून कार कोणत्या मार्गाने तारिकपर्यंत पोहोचली हे स्पष्ट होऊ शकेल.
दिल्ली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, स्फोटासाठी वापरेलेल्या कारची सर्व्हिस आणि ओनरशिप हिस्ट्री दोन्हींची तपासणी सुरू आहे. त्याचबरोबर, तारिक आणि उमर दिल्लीला कधी आले होते आणि स्फोटाच्या दिवशी त्यांचे लोकेशन काय होते, याचाही शोध घेतला जात आहे.



Comments