दोन बसेसची समोरासमोर भीषण धडक ; 11 जणांचा मृत्यू 40 जण जखमी
- Navnath Yewale
- 10 hours ago
- 1 min read

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात झालेल्या भिषण रस्ते अपघातात 11 जणांचा मृत्यू तर 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दोन सरकारी बसेसची समोरासमोर टक्कर झाल्याने हा अपघात झाला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अपघातानंतर बसच्या ढिगार्यात नऊ महिला आणि दोन पुरुष अडकलेले आढळले. ज्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तात्काळ कराईकुडी आणि तिरुपत्तूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक चालक आणि रहिवाशांनी तातडीने बचाव कार्यात मदत केली.
मदुराईहून कराईकुडला जाणारी बस आणि कराईकुडीहून मदुराईला परतणार्या दुसर्या बसमध्ये हा अपघात झाला. शिवगंगाजवळील पिल्लैयरपट्टी परिसरात दोन्ही बसेसची टक्कर झाली. ज्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही जखमींना शिवगंगा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हि घटना काही दिवसांपूर्वी थेंकसी येथे झालेल्या दुसर्या बस अपघाताची आठवण करून देते, जिथे दोन खासगी बसेसची टक्कर झाली होती, ज्यामध्ये सात प्रवासी मृत्यूमुखी पडले होते आणि 30 जण जखमी झाले होते. एका आठवड्यातील हा दुसरा मोठा अपघात मोठ्या प्रमाणात चिंतेचे कारण आहे.
काही लोकांचा आरोप आहे की, अपघातग्रस्त भागातील रस्ता अरुंद आहे आणि बस जास्त वेगाने चालवल्या जातात. शिवाय अपघाताचे कारण वेगामुळे होते का हे अद्याप निश्चित झालेले नाही. चालकाचा निष्काळजीपणा होता की इतर काही करण होते हे अधिकारी तपास करत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अधिकार्यांनी सांगितले की, अपघाताचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच कळेल. चार पदरी रस्त्याच्या बांधकामामुळे, सध्या तिरुपत्तूर, पिल्लैयारपट्टी- कुंद्रातूर रस्त्यावर बसेस धावत आहेत. जो अरुंद आणि वळणदार असल्याचे वर्णन केले जाते.



Comments