नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का; लोह्याचे माजी उपनगराध्यक्ष शरद पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
- Navnath Yewale
- Nov 16
- 2 min read

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सध्या मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. नांदेडमध्ये अजित पवार यांच्या पक्षात मोठ्या नेत्याने प्रवेश केला आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हास्तरावर वर्चस्व स्थापित करण्यासाठी राजकीय पक्षांनी चंग बांधल्याने स्थानिक पातळीवरील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यापासून पक्षांतराचे पेव फुटले आहे. आपल्या पक्षात तिकीट मिळत नसल्याचा अंदाज घेत माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक सोईच्या पक्षात उड्या घेत आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही गटांत पक्षांतराची एक लाट आली आहे.
पक्षबदल करताना सध्याच्या पक्षाचा राजीनामा देऊन मित्रपक्षामध्ये समील होण्याचीही काही उदाहरणे समोर आली आहेत. नांदेड जिल्ह्यात भाजपाला धक्कादेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत झालेला पक्षप्रवेश माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांना मोठा धक्का मानला जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील भाजपाचे लोहा तालुका मंडळ अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश घेण्यात आला. शरद पवार यांनी लोह्याचे उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. शरद पवार हे भाजपाचे नेते तथा खासदार अशोक चव्हाण यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना हा जबर धक्का मानला जात आहे.
लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीची धुमाळी सुरू आहे. या निवडणुकीची घोषणा होताच स्थानिक पातळीवर भाजपा, राष्ट्रवादी तसेच इतर पक्षांकडून विजयासाठी गणितं आखली जात आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवर ताकद असलेल्या नेत्यांना पक्षात स्थान दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांच्या पक्षाने शरद पवार यांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे.
तर दुसरीकडे उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडणार्या नेत्यानेचे ऐनवेळी भाजपाला रामराम ठोकल्याने येथे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. लोहा नगरपरिषद जिंकण्यासाठी आता भाजपाला शरद पवार यांच्या तुल्यबळाचा चेहरा शोधावा लागणार आहे.



Comments