top of page

नाशिकच्या भामट्याच्या बीड पोलिसांनी मुसक्या आवळल्या चमत्काराच्या नावाखाली सोन्याची अंगठी केली होती लंपास; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बीड: चमत्काराच्या नावाखाली एका वृद्धाची सोन्याची अंगठी हातचालाखीने लंपास करणार्‍या सावरगाव (जि. नाशीक) येथील भामट्यास बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


या बाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी भीमा सोनाजी जाधवर (वय 58 रा. काशीदवाडी ता. केज ) यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फेब्रूवारी (दि.1) सकाळी ते पुणे येथे उपचारासाठी जाण्यास केज बसस्थानकात बसची वाट पाहत होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी संवाद साधत चमत्कार पहायचा आहे का? असे विचारले. त्यांनी फिर्यादीची सुमारे 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून पांढर्‍या रुमालात ठेवत असल्याचा बनाव केला व 10 मिनिटे डोळे बंद करा, चमत्कार दिसेल असे सांगून हातचालखीने अंगठी चोरून पासर झाला. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान या गुन्ह्याचा समांतर पतास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. पोलिस उपनिरिक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोन संशयित इसमांचे फुटेज मिळाले. गोपनीय माहितीच्या आधारे आरेापी हे येवला (जि. नाशिक) येथील असून मदारी खेळ व हाजचालाखी करणारे असल्याचे निष्पन्न झाले.


यानुसार पथक येवला येथे रवाना झाले व फुटेज मधील आरोपी अमजद नबाब मदारी (रा. सावरगाव, ता. येवला) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदार राजू मदारी याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली 6 ग्रॅम सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे 24 हजार रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे. आरोपीस पुढील कारवाईसाठी केज पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून फरार साथीदाराचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत , अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके यव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक महेश विघ्ने, पोहेकॉ महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गीते, गणेश मराडे यांनी केली.

Comments


bottom of page