नील सोमय्याच्या वार्डात अपक्ष उमेदवारास ठाकरे, पवारांचा पाठिंबा !
- Navnath Yewale
- Jan 5
- 2 min read

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या हे मुलुंडच्या वार्ड क्रमांक 107 मधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. नील सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकउून उमेदवार देण्यात आलेला नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. वॉर्ड क्रमांक 107 ची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली होती. मात्र, राष्ट्रवादीचा अर्ज बाद ठरला होता. त्यामुळे नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे बालले जात होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे दिनेश जाधव यांनी वॉर्ड 107 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेना ठाकरे गटाचे दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. आता दिनेश जाधव यांनी नील सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
नील सोमय्या यांनी अनेकांना दमदाटी केली, असा गंभीर आरोप दिनेश जाधव यांनी केला आहे. मात्र, मला दमदाटी करण्याची त्यांच्यात हिंमत नाही, अशा शब्दात दिनेश जाधव यांनी नील सामेय्या यांना आव्हान दिले आहे. तसेच नील सोमय्या काहीतरी गडबड करणार, याची मला माहिती होती. त्यामुळे मी अपक्ष अर्ज भरला, असे देखील त्यांनी म्हटले आहे. सोमय्या यांनी आतापर्यंत अनेकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी अशा धमक्यांना भीक घालत नाही. या प्रभागातील जनता मराठी अस्मितेसाठी आणि हक्काच्या प्रतिनिधीसाठी मला साथ देईल असा विश्वास देखील दिनेश जाधव यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, दिनेश जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाले की, हा वॉर्ड मराठी भाषिक आहे. मराठी मतदार इथे जास्त आहेत. आमची पूर्वीपासून इच्छा होती की, हा वॉर्ड मनसे, शिवसेना, आणि राष्ट्रवादीच्या युतीत आम्हाला मिळायला हवा. परंतु वाटाघाटीत ती जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेली. तरीसुद्धा एक शंका होती की, सध्या निवडणूक आयोग जे करत आहेत आणि तिथे ज्या प्रमाणात दादागिरी सुरू आहे. त्या भीतीपोटी कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ज मागे घेतला जाईल किंवा काहीतरी त्रुटी येईल. त्यामुळे मी 30 तारखेलाच अपक्ष फॉर्म भरून ठेवला होता.
याशिवाय अजून काही अपक्ष उमेदवारांसोबत दमदाटी करण्यात आली होती. काही गुजरातील उमेदवार होते. त्यांच्यासोबत देखील दमदाटी करण्यात आली होती. परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांना वाटले की, नील सोमय्या बिनविरोध होईल आणि जिंकून येईल. पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. गेल्या 30-35 वर्षापासून मी या प्रभागात काम करत आहे. शाखाप्रमुख म्हणून मी दहा वर्ष काम केले आहे. आता उपविभाग प्रमुख म्हणून मी आठ वर्षापासून काम करत आहे. माझ्यासोबत शिवसैनिकांची ताबद आहे. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असल्यामुळे मी ठरवले की नील सोमय्यांसोबत लढायचे, असंही जाधव म्हणाले.



Comments