पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य, राज्यभरात पडसाद; सत्ताधार्यांनी सुनावलं, विरोधकांकडूनही निषेध
- Navnath Yewale
- Sep 19
- 2 min read

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गापीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचाही अपमान केला, दरम्यान यावरून राज्यात आता वातावरण चांगलंच तापलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आज रज्यभरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतिने आंदोलनं करण्यात आली.
गोपीचंद पडळकरांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना फोन करून समज दिली आहे. स्वत: गोपीचंद पडळकर यांनी याबद्दलची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला होता, त्यांनी मला सांगितलं आहे की अशा प्रकारचे वक्तव्य करू नका, तसेच त्यांनी मला काही सूचना देखील केल्या आहेत, आता मी त्यांच्या सूचनांचे पालन करणार आहे, असं पडळकर म्हणाले.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य हे सुसंस्कृत नाही, महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी संस्कृती नाही आम्ही पण गेली अनेक वर्षापासून राजकारण करतो, मात्र टीका करताना भान बाळगले पाहिजे, असं धंगेकर म्हणाले. काँग्रेसनं देखील पडळकर यांच्या या वक्तव्यावर तीव्र निषेध नोंदवला आहे. गोपीचंद पडळकर कमरेखालची भाषा गेली अनेक वर्ष बोलत आहेत. त्यांना पाठीशी घालण्याचे काम भाजपचे शीर्ष नेतृत्व करतय. सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे दोन्ही खासदार पडले त्यामुळे ते जिल्ह्याला सापत्न वागणूक देत आहेत, अशी प्रतिक्रिया यावर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी दिली आहे.
अशोक चव्हानांनी टोचले कान
गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर भाजप खासदार अशोक चव्हाणांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे चांगलेच कान टोचले. टीका करण्याचा सर्वांना अधिकार मात्र, वैयक्तिक पातळीवर टीका करणे अतिशय अशोभनिय आहे. महाराष्ट्रात काही नेते खालच्या स्तराला जाऊन टीका करत आहेत. लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असला तरी इतरांना ही भावना आहेत. त्यांच्या भावना लक्षात ठेऊन आपण पातळी न सोडता आपली भूमिका योग्यरितीने मांडली पाहिजे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या वक्तव्यावरून पडळकर यांना चांगलच सुनावलं आहे. जयंत पाटील यांच्याविरुद्ध वापरलेली अर्वाच्य, घाणेरडी आणि अमानुष भाषा ही फक्त एका व्यक्तीचा अपमान नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आणि मातृशक्तीचा अवमान आहे, असं ठाकूर म्हणाल्या.


Comments