पद्म पुरस्कार 2026 जाहीर; महाराष्ट्रात तीन पद्म विभूषण तर 11 पद्मश्री पुरस्कार
- Navnath Yewale
- Jan 25
- 2 min read

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन 2026 च्या पूर्वसंध्येला देशातील प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांच्या घोषणेने संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे. या वर्षीच्या यादीतील सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे “ पीपल्स पद्म” या भावनेवर लक्ष केंद्रित करणे आहे. या वर्षी सरकारने त्या अज्ञात नायकांचा सन्मान करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे, जे समाजाच्या सीमांत राहूनही बदलाची कहाणी लिहित आहेत.
कर्नाटकचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ अंके गौडा यांचे नाव या यादीत प्रथम आहे. साहित्य आणि शिणिातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना “ पद्मश्री” प्रदान केले जाईल. महत्वाचे म्हणजे या वर्षी मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी समुदायातील त्या शूर नेत्यांना महत्व देण्यात आले आहे. ज्यांनी प्रसिद्धीचा शोध न घेता, दुर्गम भागातील शिक्षण, आरोग्य आणि समाजकल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे मानाचे पुरस्कार घोषित केले जातात. 2026 च्या पुरस्कारांसाठी कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार आणि समाजसेवा आदी विविध क्षेत्रात योगदान देणार्यांचा समावेश आहे. देशभरातून एकूण 131 मान्यवरांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असून त्यात 5 पद्म विभूषण, 13 पद्म भूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 19 महिला, 6 परदेशी अथवा अनिवासी भारतीय तसेच 16 व्यक्तींना मरणोत्तर हा सन्मान जाहीर झाला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोत्तर ‘पद्म विभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्म भूषण श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील तीन मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक (कला), जाहिरात क्षेत्रातील दिग्गज श्री पीयूष पांडे (मरणोत्तर-कला) आणि बँकिंग क्षेत्रातील श्री उदय कोटक (व्यापार व उद्योग) यांचा समावेश आहे.
पद्मश्री पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील 11 मान्यवरांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये क्रीडा क्षेत्रातून क्रिकेपटू रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी श्रीमती आर्मिडा फर्नांडिस, समाजसेवेसाठी श्री.जनार्दन बापूराव बोथे आणि कृषी क्षेत्रासाठी श्री श्रीरंग देवबा लाड यांचा समावेश आहे. कला क्षेत्रातून श्री. भिकल्या लाडक्या धिंडा , श्री माधव रंगनाथ , श्री. रघुविर तुकाराम खेडकर आणि श्री सतीश शाह (मरणोत्तर) यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. तसेच व्यापार व उद्योग क्षेत्रातून श्री अशोक खाडे व श्री सत्यनारायण नुवाल आणि विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातून श्री जुझेर वासी यांना हा सन्मान जाहीर झाला आहे.
येत्या मार्च एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते हे सर्व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. दरम्यान, यावर्षीच्या निवड प्रक्रियेमुळे हे स्पष्ट झाले आहे की, हा सन्मान आता केवळ प्रमुख शहरांपुरता मर्यादित नाही.



Comments