पर्यावरण क्षेत्रात पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था महत्वपूर्ण भूमिका बजावेल!
- Navnath Yewale
- 6 days ago
- 1 min read
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम देवेंदर सिंह यांचे प्रतिपादन

पुढील भविष्यात पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था अर्थातच सर्क्युलर इकॉनोमी पर्यावरण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव श्री एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.
आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने "पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी" या विषयांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन तुर्भे नवी मुंबई येथे केले होते. या परिषदेचे उद्घाटन श्री एम देवेंदर सिंह यांनी केले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की वर्तमानात इमारत बांधणी क्षेत्र आणि त्यातून नवीन इमारतीची पुनर्बांधणी यातून निघणारा बांधकाम कचरा याकरिता नवीन नियमावली करणे गरजेचे असून यातून पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था निर्माण करणे हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अकरा प्रकारच्या कचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांची सूची " पुनर्चक्रीय अर्थव्यवस्था निर्देशिका 2025" तयार केली असून या कामाचे नुकत्याच कर्नाटक राज्यात झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण परिषदेत कौतुक केले गेले.
महाराष्ट्र राज्याने प्रत्येक क्षेत्रात दिशादर्शक काम केले असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण संवर्धन व प्रदूषण नियंत्रणात केलेल्या कामाची दखल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील वारंवार घेत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1970 च्या दशकात नैसर्गिक संसाधनांचा केला जाणारा वापर हा आता सहा पट वाढला असून त्यातून निर्माण होणारे प्रदूषणाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अग्रक्रम द्यावा लागेल आणि निश्चित कालमर्यादेत यावर उपाययोजना देखील कराव्या लागतील.
मंडळ इज ऑफ डूइंग बिजनेस च्या माध्यमातून उद्योगांना निश्चितच चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातअसून त्या अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असा विश्वास श्री सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.
या पर्यावरण परिषदेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तांत्रिक सल्लागार श्री नंदकुमार गुरव, सहाय्यक सचिव तांत्रिक श्री राजेंद्र राजपूत, सहसंचालक श्री सतीश पडवळ, मंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
त्याचबरोबर पुनर्चक्रीत उद्योगाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, मटेरियल रिसायकलिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांचे पदाधिकारी, पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर, संशोधक, उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.



Comments