पोलिस ठाण्यावरच दगडफेक, नाशिकमध्ये आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण
- Navnath Yewale
- Oct 4
- 1 min read
पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या, परिसरात ताणावपूर्ण शांतता

काही दिवसांपूर्वी एका शेतकर्याने आदिवासी शेतमजुराचे अपहरण करून हत्या केली होती. या प्रकरणात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू होते. तक्रार दाखल करूनही योग्य ती दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत आंदोलकांचा रोष उसळला. या आंदोलनादरम्यान, पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या शाब्दिक वादातून ही दगडफेक झाल्याची माहिती आहे. सध्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
जिल्ह्यातील कळवण खूर्द येथील शेतमजूर विठोबा पवार यांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करावी, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी कळवण पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, पोलिस व आंदोलनकर्त्यामध्ये वाद होऊन तणाव निर्माण झाला. यावेळी संतप्त आंदोलकांनी थेट पोलिस स्थानकावरच दगडफेक केल्याने एकच धावपतळ उडाली. जमावाने पोलिसांवर दगडफेक करत ठाण्याच्या आवारातही घुसण्याचा प्रयत्न केला.
या घटनेने काही काह तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत पोलिस कर्मचारी व पत्रकार जखमी झाले आहेत. तर पेालिस वाहनाच्या काचाही फुटल्या. या घटनेनंतर पोलिसांनी अपहरण करणार्या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नंदुरबारमध्ये अशीच घटना घडली होती. आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. परंतु त्या मोर्चालाही हिंसक वळण लागलं होतं. पूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली होती. बंदोबस्ताला असलेल्या पोलिस आणि उपद्रव्यांमध्ये दगडफेक झाली होती. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.



Comments