top of page

बीडच्या माजीसरपंच, व्यापार्‍याने तामिळनाडूत खपवल्या बनावट नोटा पोलिसांच्या कारवाईत 8 लाख 50 हजावर बनावट नोटा जप्त

Jan 30
1 min read

बीड: केज (जि. बीड) तालुक्यातील एका माजी सरपंचासह एका कृषीपंप व्यापार्‍याने तामिळनाडू राज्यात बनावट नोटा चालवण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे. तामिळनाडू पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून साडे आठ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.


तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थुवाकुडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणाचा तपास तामिळनाडूच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. केज येथील माजी सरपंच बाबुराव भांगे सोबत मूळचा राजस्थानचा असलेला व्यापारी नारायण राम पटेल हे दोघे त्यांच्या खासगी कार क्रमांक एम.एच. 44 झेड 2382 ने तामिळनाडूत फिरायला गेले होते. बुधवारी इंधन भरताना त्यांनी एका पेट्रोल पंपावर 200 रुपयांच्या काही नोटा दिल्या.


तेथून ते निघूनही गेले मात्र कर्मचार्‍याला नोटांचा स्पर्श आणि कागदावरुन संशय आला. त्याने तातडीने याची माहिती पेालिसांना दिली आणि पोलिसांनी मंजाथिदल चेक पोस्टवर सापळा रचून ही कार आडवली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये 200 रुपयांच्या बनावट नोटांचे तब्बल 41 बंडल दडवून ठेवलेले आढळले. कारवाईत सापडलेल्या 8 लाख 37 हजार 800 रुपयांच्या नोटा या बनावट असल्याचे समोर आले. तपासादरम्यान या दोघांनी मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर भागात यापूवीृच अनेक नोटा चलनात आणल्याची कबुली दिली आहे.


या बनावट नोटा त्यांना कोणी पुरवल्या? या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत ? आणि तामिळनुडमध्ये त्यांना कोणी आश्रय दिला होता ? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आता गुप्त वार्ता विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सक्रिय झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Comments


bottom of page