top of page

बीडच्या शिरुर तालुक्यातील ‘ तो ’ बालविवाह दडपवण्याचा प्रयत्न न्यायासाठी अल्पवयीन मुलीच्या आईची ग्रामीण विकास केंद्राकडे धाव

बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील एका गावात महिनाभरापूर्वी झालेला बालविवाह स्थानिक प्रशासनाकडून दाबण्यात आल्याचा प्रकार घडला असून अल्पवयीन मुलीच्या आईनेच या संदर्भात ग्रामीण विकास केंद्र या बालविवाह विरोधी काम करणाऱ्या संस्थेकडे कारवाई करण्यासाठी धाव घेतली आहे.या संदर्भात अधिक माहिती अशी की,11 जून रोजी तालुक्यातील एका गावात 15 वर्ष वय असलेल्या मुलीचा बालविवाह गावातीलच 28 वर्षीय तरुणासोबत लावण्यात आला होता.त्याबाबत मुलीच्या आईने शिरूर पोलिस स्टेशनसह बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यासाठी धाव घेतली.परंतु पोलिसांनी सदरील काम आमचे नाही असे म्हणत महिलेला बालविकास कार्यालयाकडे पाठवून दिले.


त्यानंतर सदरील महिला संबंधित कार्यालयाकडे गेली आणि लेखी तक्रार अर्ज दिला.त्यावर कार्यालयाने लग्न झाल्यावर आमच्याकडे अर्ज देऊन काही उपयोग नाही असे सांगितले.मुलाकडील नातेवाईक शेवगाव तालुक्यातील असल्याने तुमची तक्रार शेवगावला दाखल करण्यास सांगितले म्हणून सदरील महिला आणि तिच्या नातेवाईकांनी शेवगाव पोलीस स्टेशनला दोन चकरा मारल्या.तेंव्हा तेथील पोलिसांनी आम्ही कोणाचेही अर्ज घेत नाही.तुम्ही तुमच्या तालुक्यात जाऊन तक्रार करा.आम्हाला काय हेच काम नाही असे म्हणून अपमानास्पद वागणूक दिली.


शेवटी सदरील महिलेने जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक,चाईल्ड लाइन,बीड यांच्याकडे तक्रार दाखल केली.त्यानंतर ग्रामसेवकाने पंचनामा केला.परंतु पंचनाम्यावेळी तक्रारदार महिलेला आणि बालविवाह झाल्याची माहिती असलेल्या लोकांना बोलावले नाही.म्हणून बालविवाह झाल्याची माहिती असतानाही आणि बालविवाहानंतर नवदाम्पत्य जेजुरीच्या खंडोबाला जाऊन आले आणि जागरण गोंधळ देखील केला.या बालविवाहाची आणि त्यानंतरच्या सर्व कार्यक्रमांची माहिती असतानाही स्थानिक ग्रामसेवकाने साखरपुडा झाला असल्याचा पंचनामा सादर करून प्रशासनाची दिशाभूल केली आहे.


हा सर्व प्रकार ग्रामसेवक आणि बालविवाह घडवून आणणाऱ्या सर्व लोकांनी आपसात संगनमत करून दाबण्याचा प्रकार चालवला असल्याने तक्रारदार महिलेने ग्रामीण विकास केंद्राकडे सविस्तर तक्रार अर्ज देऊन या प्रकरणी कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करून मदत करण्याची मागणी केल्याने ग्रामीण विकास केंद्राचे बालहक्क कार्यकर्ते ॲड.समीर पठाण यांनी त्यांचे अहवालासह महिलेच्या तक्रारीनुसार प्राप्त पुरावे बालकल्याण समिती तथा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायपीठ,बीड यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केले असून बालकल्याण समिती या प्रकरणी काय कारवाई करते? याकडे लक्ष लागले आहे.


आमचा तिच्या बालविवाहाला विरोध होता : माझी भाची १५ वर्षाची असुन आमचा तिच्या बालविवाहासाठी विरोध होता.तरी सुद्धा मुलीच्या वडिलांनी व इतर नातेवाईकांनी आम्हाला न कळवता अज्ञात ठिकाणी बालविवाह लावून दिला.त्यामुळे आम्ही अनेक कार्यालयात तक्रारी दिल्या परंतु बालविवाह दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे कळताच आम्ही ग्रामीण विकास केंद्रकडे मदत मागितल्याने त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.या प्रकरणात कारवाई व्हावी अशी मुलीच्या मामाने मागणी केली आहे.


पुढील कारवाईवासाठी बालकल्याण समितीकडे प्रकरण पाठवले: आमच्याकडे सदर बालविवाह प्रकरण दाबण्यात येत असल्याने तक्रारदार महिलेने अर्ज देऊन पाठपुरावा करून मदत करण्याची मागणी केल्याने आम्ही त्या अनुषंगाने या प्रकरणात तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे हलगर्जीपणा करणारे पोलिस इतर कार्यालयाचे अधिकारी,कर्मचारी आणि ग्रामसेवक यांची देखील चौकशी करण्यात यावी व प्राप्त पुराव्या आधारे चौकशी करून पुढील कारवाई करावी यासाठी बालकल्याण समिती बीड यांचेकडे प्रकरण पाठवले असून मा.राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व मा.महिला व बाल कल्याण मंत्री यांचेकडे देखील या प्रकरणी कारवाई व्हावी म्हणुन पाठपुरावा करत आहोत.

ॲड.समिर पठाण (बाल हक्क कार्यकर्ते, ग्रामीण विकास केंद्र)

bottom of page