top of page

बीडमध्ये ओबीसी नेत्याच्या वाहनावर हल्ला!

ree

बीड: ओबीसी नेते अ‍ॅड. मंगेश ससाणे यांच्या वाहनावर अज्ञातांनी शनिवारी (दि.13) हल्ला केला. माजलगावहून पुण्याकडे येताना अ‍ॅड. ससाणे यांच्या वाहनाचा पाठलाग करून धारूर जवळ त्यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात मंगेश ससाणे यांच्या वाहनाचे नुकसान झाले. रात्री उशीरा धारूर पोलिस ठाण्यात मंगेश ससाणे यांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे.


मागील काही महिन्यांपूर्वी माजलगाव तालुक्यातील एका हॉटेलमध्ये पवन करवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, पवन करवर हल्ल्याच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी अ‍ॅड. मंगेश ससाणे शनिवारी (दि.13) माजलगाव पोलिसाठाण्यात आले होते. सायंकाळी काम आटोपून अ‍ॅड. ससाणे रात्री उशीरा ते माजलगावाहून पुण्याच्या दिशेने धारूर मार्गे आपल्या चारचाकी वाहनाने निघाले. वाटेत विसावा हॉटेलवर थांबून पुढच्या प्रवासाला निघालेल्या अ‍ॅड. ससाणे यांच्या वाहनाचा अज्ञात दोन दुचाकीस्वारांनी पाठलाग केला.


हल्लेखोरांनी अ‍ॅड. ससाणे यांच्या वाहनावर दगडफेक केली या हल्ल्यातून अ‍ॅड. ससाणे यांना सुदैवाने दुखापत झाली नाही. मात्र, वाहनाची मागील व उजव्या बाजूची काच फुटली. अ‍ॅड. ससाणे यांनी हल्ला होताच तत्काळ सोशल मिडीयाच्या फेसबुक प्लॅटफार्मवर लाईव्ह येत घटनेची माहिती दिली. दरम्यान, अ‍ॅड. मंगेश ससाणे यांनी रात्री उशीरा धारूर पोलिस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती देत तक्रार दिली. अ‍ॅड. ससाणे यांच्या तक्रारीवरून अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात धारूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ओबीसी नेते अ‍ॅड. मंगेश ससाणे मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जातात. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामध्ये त्यांनी वडीगोद्री, पुणे येथे उपोषण, आंदोलन केले होते. शिवाय ओबीसी आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहीला आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणा विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

Comments


bottom of page