बीडमध्ये शरद पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला
- Navnath Yewale
- Nov 26
- 2 min read
इनोव्हा फोडली; राम खाडेवर गंभीर अवस्थेत आहिल्यानगरमध्ये उपचार सुरू

बीड: राज्यात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याची घटना समोर आली आहे.
बीडमधील आहिल्यानगर -बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदळी गावा जवळ रस्त्यावर हा हल्ला झाला आहे. दहा ते पंधरा जणांनी धरदार शस्त्रांनी गाडीवर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यामध्ये राम खाडे गंभीर जखमी असून आहिल्यानगरमधील खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी राम खाडे यांच्यावर मांदळी येथे दहा ते पंधरा हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी राम खाडे यांची गाडी पूर्ण फोडून टाकली. त्याचबरोबर राम खाडे यांच्यासमवेत तीन ते चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र, हा हल्ला कुणी केला या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळावर दाखल झाले आहेत. राम खाडे यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी आहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महेबूब शेख यांचे गंभीर आरोप
या हल्ल्याबाबत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी एक फेसबुकवर पोस्ट करून महिती दिली. बीडचे नामांकित सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ खाडे यांच्यावर काही वेळापूर्वी अहमदनगर (आहिल्यानगर) जिल्ह्यातील मांदाळी गावातील एका हॉटेलजवळ अनोळखी व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला आहे. रामभाऊ खाडे हे गेल्या अनेक वर्षापासून भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे पर्दाफाश करत आहेत. त्यामुळे घोटाळे उघड करणार्या व्यक्तीवर हा हल्ला ठरवूनच करण्यात आला असावा, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी न्यायालयाने त्यांना पोलिस सुरक्षा दिली होती, मात्र गृह विभागाने कोणाच्या सांगण्यावरून त्यांची सुरक्षा अचानक काढून घेतली, हे अत्यंत धक्कादायक आहे.
तसंच, खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या बंदुकीचे रिन्यूअलही मुद्दामहून थांबवण्यात आले, हे ही उघडपणे दडपशाहीचे संकेत देणारे आहे, याहूनही गंभीर बाब म्हणजे राज्यातील गृहमंत्री पूर्णपणे निष्क्रिय आहेत. ज्यांनी समाजातील अन्याय आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला, अशा लोकांच्या जीवावर हल्ले होत आहेत. आणि सरकार हातावर हात ठेवून बसले आहे. असे हल्ले होत असताना सामान्य लोकांनी मग जगायचे कसे? प्रशासन मूकबधिर झाले तर न्याय कुठून मिळणार आणि लोकांचा जीव कोणाच्या भरोशावर? असा सवालही महेबूब शेख यांनी केला आहे.



Comments