top of page

मनसे-उद्धवसेनेत वादाची ठिणगी; राज ठाकरेंच्या त्या 11 उमेदवारांवरून धुसपूस

ree

शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात अंबरनाथमध्ये शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी युती करीत लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विरोधकांना रोखण्यासाठी एकत्र आलेल्या युतीत निवडणुकीपूर्वीच धुसपूस सुरू झाल्याचे बोलले जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेने विरोधात लढणार्‍या उबाठाच्या निष्ठावंताना डावलत त्या प्रभागात मनसेच्या उमेदवारांना प्राधान्य देत उमेदवारी दिल्यावरून उबाठा आणि मनसेतही नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.


अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत यंदा युती, आघाडीतील बिघाडीने अनेक पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात शिवसेना, भाजप यांच्यात खरी लढत होणार असली, तरी युतीतील राष्ट्रवादी आणि मविआतील काँग्रेसही नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरली आहे. तर दुसरीकडे मविआतील शिवसेना उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी (शप) यांनी युती करत उबाठाचा उमेदवार नगराध्यक्षपदी दिला आहे. मात्र, निवडणुकीपूर्वीच मविआत शिवसेना (उबाठा) अणि मनसेत काही ठिकाणी जागा वाटपावरून धुसपूस सुरू असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनाच्या (उबाठा) निष्ठावंतानी शिवसेनेविरोधात लढाई लढली होती. त्यामुळे उबाठाचे अनेक पदाधिकारी पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक होते. मात्र, शिवसेनेकडून (उबाठ) 35 तर मनसेकडून 11 उमेदवार देण्यात आले असून मनसेचे उमेदवारही उबाठाच्या मशाल चिन्हावर निवडणुक लढवत आहेत. मात्र, उमेदवारी देताना काही ठिाकणी उबाठाच्या पदाधिकार्‍यांना डावलून मनसेच्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याने नाराजी पसरल्याचे बोलले जात आहे.

Comments


bottom of page