मराठा आरक्षणासाठी लातूरमध्ये तरुणाची आत्महत्या विहिरीत उडी घेऊन संपवली जीवनयात्रा, आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी; ग्रामस्थ नातेवाईकांचा उदगीर- लातूर मार्गावर रास्ता रोको
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 1 min read

लातूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू आहे. राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असतानाच लातूर जिल्ह्यातून अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शिरुर आनंतपाळ तालुक्यातील सुमठाना येथील सुनील विनायक बिरादार या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि.8) दुपारी समोर आली. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ, कुटुंबीयांनी उदगीर- लातूर महामार्गावर मृतदेह ठेवून रास्ता रोको आंदेालन सुरू केल्याने तणाव निर्माण झाला.
तरुणाच्या आत्महत्येची बातमी पसरताच संतप्त ग्रामस्थ आणि मराठा बांधव आक्रमक झाले. त्यांनी मोड येथे उदगीर- लातूर महामार्गावर सुनीलचा मृतदेह ठेवून चक्काजाम आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या घोषणांनी परिसरात दणाणून सोडला. महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांग लागल्याने वाहतूक ठप्प झाली.
दरम्यान, सुनील बिरादार या तरुणाने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत त्याने नमूद केले आहे की, मी सुनील विनायक बिरादार, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवत आहे. सुनील बेपत्ता झाल्यानंतर ग्रामस्थांनी परिसरात शोध घेतला असता, गावातील विहीरीत त्याचा मृतदेह आढळून आला. ही माहिती वार्यासारखी पसरताच संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
आंदोलकांनी मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला तातडीने शासकीय सेवेत घेण्याचे लेखी अश्वासन द्यावे, मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने तात्काळ लेखी निर्णय घ्यावा, जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन या मागण्यांचे लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यविधीही करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली.
घटनेचं गांभीर्य राखून पोलिस प्रशासन आणि महसूल विभागाचे वरिषठ अधिकारी तातडीने मोड येथे आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलकांची समजूत काढून माहामार्ग खुला करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आंदोलक मागण्यांवर ठाम असल्याने लातूर जिल्ह्यात तणावाचे वातारण निर्माण झाले आहे.



Comments