top of page

महाराष्ट्र हादरला, एमपीएसी 2012 चे टॉपर वरिष्ठ जीएसटी अधिकारी कारमध्ये मृतअवस्थेत अढळले

बीड: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत 2012 साली राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेले आणि इंग्रजी व्याकरणाचे लेखक म्हणून ओळख असलेले राज्यकर अधिकारी सचिन नारायण जाधवर यांचा बीड जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हा मृत्यू हत्या की आत्महत्या याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलिस प्रशासानाकडून सखोल तपास सुरू आहे.


अधिक माहिती अशी की, सचिन जाधवर यांच्या पत्नीने आज सकाळी ते रात्री घरी परत न आल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोधमोहिम सुरू केली. मात्र काही तासांतच बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ग्रामीण भागात एका गाडीमध्ये त्यांचा मृतदेह अढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

प्राथमिक माहितीनुसार, ज्या कारमध्ये सचिन जाधवर यांचा मृतदेह आढळून आला त्या गाडीमध्ये एक मडके सापडले असून गाडीच्या खालीही एक मडके अढळून आले आहे. विशेष म्हणजे या मडक्यांमध्ये कोळसे असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब अत्यंत संशयास्पद असून मृत्यूच्या कारणांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.


हत्या की आत्महत्या तपास सुरू?

हा मृत्यू आत्महत्येने झाला की त्यांची हत्या करण्यात आली? याबाबत कोणताही अधिकृत निष्कर्ष अद्याप काढण्यात आला नाही. जाधवर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली, याचा उलगडा शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासानंतरच होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


दरम्यान, सचिन जाधवर हे अत्यंत हुशार, अभ्यासू आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी इंग्रजी व्याकरणावर आधारित अनेक पुस्तके लिहिली असून स्पर्धा परिक्षा क्षेत्रात त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे प्रशासकीय वर्तुळात तसेच विद्यार्थी आणि वाचकांमध्ये शोककळा पसरली आहे. या संपूर्ण प्रकणाचा बीड ग्रामीण पोलीस कसून तपास करत असून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स तसेच सहकार्‍यांचे जबाब नोंदवले जात आहे . मृत्यूमागचे नेमके कारण लवकरात लवकर समोर यावे, अशी मागणी नातेवाईकांसह नागरिकांकडून केली जात आहे. सध्या तरी सचिन जाधवर यांचा मृत्यू हे एक गूढ बनलं असून पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments


bottom of page