top of page

महाराष्ट्र हादरला : सोलापूरात जमिनीच्या वादातून तिहेरी हत्याकांड 25 लाख अन् संपत्तीचा वाद; दीराने भावजयच अख्खं कुटुंबच संपवलं

सोलापूर: एकीकडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण समोर आल्याने राज्यात संतापाटी लाट उसळली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच दुसरीकडे सोलापूरातून महाराष्ट्र हदरवणारी घटना समोर आली आहे. दीरानेच आपल्या वहिनी, पुतण्या, आणि पुतणीचा निर्घुण खून केला आहे. अवघ्या काही सेकंदांमध्ये आरोपीने तीन खून केल्याने अवघा सोलापूर जिल्हा सुन्न झाला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पु म्हस्के अद्याप फारार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथून तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. संपत्तीच्या वादातून दिरानेच भावजय आणि पुतण्या-पुतणीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेत हत्या झालेल्या महिलेचे नांव गायत्री मस्के असे आहे, महिलेचा पती सुधाकर मस्के यांचा 5 वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. मागील काही महिन्यांपासून गायत्री मस्के आणि त्यांचा दीर शंकर उर्फ पप्पू मस्के यांच्या संत्तीवरून वाद सुरू होते.


याच वादातून शंकर उर्फ पप्पू याने भावजय गायत्री, पुतण्या शिवराज आणि पुतणी प्रिया हिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कुटुंबाची हत्या झाल्यापासून शंकर उर्फ पप्पू मस्के गायब आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान मृत प्रिया मस्के ही बारावीच्या वर्गात शिकत होती तीने दिलेल्या परीक्षेचा काल निकाल लागला असून तिला बारावी विज्ञान शाखेतून 68.83 टक्के गुण मिळाले आहेत. परीक्षेचा निकाला पाहण्यापूर्वीच प्रिया हिची क्रूर हत्या झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तर मृत शिवराज मस्के हा देखील याच वर्षी दहावी सीबीएसई परीक्षा उत्तीर्ण झाला असून त्याला 61.82 टक्के गुण मिळाले होते.


हत्या करण्यात आलेल्या महिलेचा दीर शंकर उर्फ पप्पू मस्के याच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपत्तीच्या वादातूनच हे तिहेरी हत्याकांड झाल्याची नातेवाईकांनी तक्रार दिली आहे. मृत गायत्री मस्के यांनी संपत्तीतील वाटा तसेच आरोपी शंकर मस्के याला हातउसणे दिलेल्या 25 लाख रुपयांसाठी तगादा लावला होता. त्यातूनच आरोपीने हे हत्याकांड केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणात पाच संशयितांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. संशयित आरोपींविरोधात सोलापूर पोलिसात बीएनएस कलम 103 (अ), 351(2),3,5 यासह शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments


bottom of page