top of page

मुख्यमंत्र्यांचा दणक्याने अधिकार्‍यांचे धाबे दणाणले; 71 दारु अड्डे उध्वस्त,135 गुन्हे दाखल,29 आरोपींना अटक

पुणे: पुण्यात विषारी दारुने 18 जणांचा बळी गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला. तब्बल 23 अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली. दारू अड्यांकडे दुर्लक्षित केल्यामुळे पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील 8 पोलीस आणि 13 उत्पादन शुल्क अधिकार्‍यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या या धडक कारवाईमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकार्‍यांना जाग आली आहे.


एरवी दारू अड्डे दिसून न दिसल्यासारख्या करणार्‍या अधिकार्‍यांमध्ये आता हे बेकायदेशीर दारूअड्डे उध्वस्त करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 135 गन्हे दाखल झाले असून सांगलीत 29 आरोपीना अटक केली आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांमध्ये कारवाईसाठी चांगली स्पर्धा लागली आहे. शनिवारी एका दिवसात बेकायदेशीर 71 दारू अड्ड्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवायांमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातभट्ट्या सुरू असल्याचे स्पष्ट झाले.


दरम्यान, मोरेवाडी, सरनोबतवाडी, कणेरीवाडी (ता. करवीर), येर्तेहट्टी (ता. चंदगड), दानोळी (ता.शिरोळ), नेसरी, हेब्बाळ, जलद्याळ (ता. गडहिंग्लज), बहिरेवाडी, मुमेवाडी (ता.आजरा), निगवे, पोहाळे(ता.पन्हाळा), माले मुडशिंगी, हेरले, नागाव (ता. हातकणंगले), करंजफेण (ता. शाहूवाडी) म्हाळुंगे (ता. करवीर) म्हाकवे (ता. कागल) आणि जाखिनपेठ (ता. भुदरगड) या ठिकाणी कोल्हापुरात कारवाई करण्यात आली.


सांगलीत 41 गुन्हे : सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यात एकूण 41 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये 29 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.


जिल्ह्यात दिनांक 29 ते 31 मे 2026 या कालावधीत अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत एक वाहन व मुद्देमालासह एकूण 5 लाख 71 हजार 765 कितीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Comments


bottom of page