दहशतवाद्यांचा हादरवणारा नियोजित कट; वांद्रे गरीबनगर कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईपोलिस अन् सुरक्षा यंत्रणा टारर्गेटवर
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 2 min read

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील क्रेन ऑपरेटर तौकीर शेख आणि कुर्ला येथील नेहरू नगरमधील वर्मा चाळीत राहणारा अरबाज साजिद मेहबूब शेख उर्फ अरबाज खान यास पोलीसांनी अटक केली. तौकीर आणि अरबाज यांच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यांनी मुंबईवरील हल्ल्याबद्दलचा सर्व प्लॅन सांगितला. मुंबई पोलिसांच्या जवानांवर ग्रेनेड हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार होतं. इतकंच नव्हं तर पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी त्यांना दिल्लीतील एका पोलीस ठाण्यावर बॉम्ब हल्ला करण्यासाठी नेमलं होतं. त्यासाठी त्यांना ट्रेनिंग देण्यात येत होतं. हे प्रशिक्षण पाकिस्तानातील एका गुप्त ठिकाणी, डी-कंपनीचा शूटर मुन्ना झिंगाडा आणि गुंड शहजाद भट्टी यांच्या निर्देशानुसार देण्यात येत होतं. पण प्रशिक्षण घेण्यासाठी नेपाळमार्गे पाकिस्तानला जाण्यापूर्वीच, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आणि महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तचर विभागाने त्यांना अटक करून हा कट उधळून लावला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन वेगवेगळ्या शहरातून अटक झाली असली तरी तौकीर आणि अरबाज एकमेकांना चांगले ओळखत होते. कारण मुंब्राला जाण्यापूर्वी तौकीरसुद्धा कुर्ल्यामध्येच राहत होता हे तपासात उघड झालं आहे. पण पुढे लग्न झाल्यावर तो मुंब्राला स्थायिक झाला होता असं चौकशीत समोर आलं आहे. पोलिसांनी या दोघांसोबत पुण्यातील विजय शूटर उर्फ विजय डॉनसह इतर सहा संशयितांनाही गजाआड केलं आहे.
दरम्यान तौकीर शेखची मावशी शेर बानो यांचीही पोलिसांनी चौकशी केली, या चौकशीत तौकिर हा निर्दोष असून त्याला फक्त आमली पदार्थांचे व्यसन आहे. तिने सांगितले की, कुर्ल्यातील उझैफाने याचा गैरफायदा घेतला असून त्याला ऑनलाइन 21000हजार पाठवण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्याने ज्या व्यक्तीकडून पैसे घेतले ती व्यक्ती एका दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. पण याबद्दल तौकीरला याची कल्पना नव्हती. असं तौकीरच्या मावशीने सांगितलं. पैसे मिळाल्यानंतर तौकीरने आपले बँक खातेसुद्ध बंद केलं होतं.
तर आरोपी अरबाजचे मामा सलमान शेखने पोलिसांना सांगितलं की, साजिदलाही 25000 हजार मिळाले होते. तो आमली पदार्थांच्या आहारी गेला होता त्यामुळे व्यसनमुक्ती केंद्रात उपचार तो घेत होता. मामा सलमानच्या म्हणण्यानुसार, मुलांना जाळ्यात अडकवण्यासाठी नेटवर्कमधील मुख्य संशयित उझैफा नावाचा एक तरुण असल्याचे सांगितलं. या व्यक्तीने आरबाजला ऑनलाइन पैसे पाठवले हाते. उझैफा अरबाजसारख्या निष्पाप मुलांना पैशाचे आमिष दाखवून अवैध कामांमध्ये ओढत होता, असं त्यांनी सांगितलं. मोठ्या रक्कमेच्या आमिषाला बळी पडून ही मुले दहशतवाद्याच्या जाळ्यात आडकली, असा दावा नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात तळागळाच्या स्तरावर डी-कंपनी आणि भट्टी गँगचे जाळे मजबूत करण्याची जबाबदारी उझैफावर देण्यात आली होती. यासाठी त्याला 500 हून अधिक तरुणांची भरती करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या उद्देशाने, उझैफा पाकिस्तानी सूत्रधारांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होता. पण सध्या उझैफा फरार आहे. तो नेपाळ मार्गे फरार झाल्याचा संशय पोलिसांना आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्य गुप्तचर विभाग आणि दहशवादविरोधी पथकाने मुंबईतील वांद्रे, कुर्ला, मालवणी, शिवाजीनगर आणि मुंब्रा- कौसा या भागांमध्ये झाडझडती घेत आहेत. त्यासोबतच पुण्यातील काही भागांमध्ये छापेमारी करण्यात येत आहे. हे छापे अजूनही सुरूच असून चौकशीसाठी डझनहून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.



Comments