राजधानी दिल्लीत जरांगे पाटीलांचा अमित शाहांना इशारा! आठ दिवसात आरोपींना अटक करा; ..अन्यथा आम्ही मुंबई जाम करू शकतो,मग म्हणू नका...
- Navnath Yewale
- 11 hours ago
- 2 min read

नवी दिल्ली: राज्यात मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठून शौर्य पाटील यांच्या कुटूंबीयांची भेट घेवून न्यायासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान मोदींना इशारा दिला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पहायला मिळत आहे.
दिल्लीतील दहावीच्या वर्गात शिकणार्या शाळकरी मृत शौर्य पाटील मृत्यूप्रकरणी महाराष्ट्रातील खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी अमित शाह यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आश्वासन दिल्याचे समजते. खासदार निलेश लंके यांच्याकडून अमित शाह यांना पत्र देण्यात आलं असता, याबाबत माझ्याकडे शरद पवार यांचेही पत्र आल्याचे अमित शाह यांनी सांगितले, अशी माहिती देण्यात आली.
दरम्यान महाविकास आघाडीच्या खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतली, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील शौर्य पाटील कुटुंबाच्या भेटीला गेले. मनोज जरांगे यांना भेटताच शौर्य पाटील याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. अमित शाह यांनी पाटील कुटुंबीयांवर मरणोत्तर अन्याय होऊ देऊ नये. शौर्य पाटील मृत्यू प्रकरणात आठ दिवसात आरोपींना अटक न झाल्यास मिशनरी शाळेचे जे फादर आहेत त्यांनी दखल घ्यावी मी अमित शाह यांना सांगतो की, तुम्ही लक्षात घ्या. नरेंद्र मोदी यांनीही लक्ष दिले पाहिजे. मुंबई आम्ही बंद करू शकतो, आमच्या मुलाचे बलिदान वाया जाणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आरोपीला आठ दिवसांत अटक करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच न्याय द्यावाच लागेल, नाहीतर महागात पडेल. मराठ्यांचे लेकरू आहे म्हणून कारवाई करत नाही का? महाराष्ट्रात चिठ्ठीत नाव असले की मुख्यमंत्री कारवाई करतात, मग केंद्रीय गृहमंत्री का कारवाई करत नाही? असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला.
माध्यमांशी बोलताना पाटील पुढे बोलताना म्हणाले की. सुसाईड नोट असताना आणखी काय पुरावा पाहिजे. समितीने अहवाल देवून ही आता कशासाठी एसआयटी नेमायची. तुम्हाला केवळ एसआयटी, समित्याच नेमायच्यात का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. येत्या आठ दिवसात शौर्य पाटील प्रकरणातील दोषींना अटक करून कठोर कावाई करावी अन्यथा आम्ही मुंबई जाम करू शकतो, मग म्हणू नका दिल्ली जाम झाली असा इशाराही जरांगे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान मोदी यांना दिला आहे.



Comments