राज्याचे क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद धोक्यात, अटकेची टांगती तलवार !
- Navnath Yewale
- Dec 16, 2025
- 1 min read

नाशिक: राज्याचे क्रीडामंत्री आरोपी माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांच्या दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा व सत्रन्यायालयाने मंगळवारी (दि.16) सुनावली. शिक्षेची अंमलबजाणी तातडीने करण्याचे आदेश जिल्हा व सत्रन्याधीश पी. एम. बदर यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रुपाली नरवाडीया यांना दिले आहेत. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलावर आहे शिवय त्यांचे मंत्रीपदही धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
न्यायालयाकडून आरोपी माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना कधीही अटकेचे समन्स बजावले जाऊ शकते. सदनिका घोटाळा कोकाटे बंधूंना अखेर भोवला. यापूर्वी नरवाडिया यांच्या कोर्टाने दिलेला निकाल सत्र न्यायालयानेही कायम ठेवला आहे.
मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखील कोट्यातून नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नरसारख्या मोक्याच्या ठिकाणी एका आपार्टमेंटमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून चार सदनिका हडपल्याच्या आरोपाखाली कोकाटे बंधूविरुद्ध खटला सुरू होता. आरोपी माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू आरोपी विजय कोकाटे यांना दोन वर्षांनी सक्तमजुरी व दहा हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
जिल्हा व सत्रन्यायालयाने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नरवाडिया यांच्या न्यायालयाला आदेशित करत शिक्षेच्या निकालाची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे कोकाटे बंधू यांना अटक करण्याचे समन्स न्यायालयाकडून काढले जाईल, असे अॅड. सुधीर कोतवाल यांनी माहिती देताना सांगितले.
काय आहे प्रकरण: सन 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणार्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती.
दरम्यान, याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरू होते. यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. या प्रकरणी आता कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.



Comments