top of page

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

पुणे : राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादी विलीनकरणाच्या चर्चा जोरात सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये काय चर्चा झाली होती हे सांगणार आहेत.


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. अशातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला होता. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती. अजित पवार त्यासाठी अग्रही होते, असा दावा वारंवार शरद पवार गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र, अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अशी कोणतही चर्चा झाली नव्हती, असे सांगत हा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे घोडे अद्याप अडले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सुचक वक्तव्य केले आहे.


बारामतीत आम्ही चार पाच जण सुनेत्रा पवारांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की, काही मदत लागली तर सांगा. कोणताही किंतू मनात बाळगू नका. विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांसोबत सुरू होती तेव्हादेखील सुनेत्रा वहिनींसोबत एकदोन वेळा भेट झाली होती. सुनेत्रा वहिनी किंवा पार्थ पवार यांच्यासाठी आम्ही सपोर्टिव्ह आहोत. त्यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. यावर आता अजितदादा गटाचे नेते काही प्रतिक्रिया देणार का, हे पहावे लागणार आहे.


दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखातून विलीनीकरणाबाबत महत्वाचे भाष्य केले होते. 12 फेब्रूवारीला आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करणार होतो. विलीनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला होता.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की, दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्यकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असेही शशिकांत शिंदे यांनी म्हटले होते.

Comments


bottom of page