शिवसेनेने दिलेल्या 15 नावांची यादी वाचून भाजपने चर्चाच बंद केली
- Navnath Yewale
- Dec 30, 2025
- 2 min read

पुणे: पुण्यात भाजप आणि शिवेसेनेच्या गोटात प्रचंड हालचाली सुरू आहेत. विशेष म्हणजे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजप आणि शिवसेनेची युती होणार का? याबाबत सस्पेन्स राहीला. अखेर ही युती तुटली आहे. पण ही युती नेमकी का फिस्कटली? याची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.
भाजप- शिवसेना युतीच्या चर्चा व उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तासापर्यंत सुद्धा संपलेल्या नव्हत्या. शिवसेना पस्तीत ते चाळीस जागेची मागणी भाजपकडे करत होती. मात्र भाजप फक्त 15 जागा देण्यास तयार होते. यावरून बरेच दिवस चर्चेचे गुर्हाळ रंगल्यानंतर अखेर शिवसेनेकडून 135 ते 140 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. मात्र भाजप सेनेचं का बिनसलं यांची अंदर की बात ही वेगळीच असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 28 डिसेंबर रोजी शिवसेनेकडून 15 उमेदवारांची यादी देण्यात आली होती. पर्यायाने हीच यादी भाजपला पाठवण्यात आली होती. या यादीवर भाजप- सेनेच्या युतीचे भवितव्य अवलंबून होते. कारण भाजप सेनेला 15 जागा देण्यास तयार होते आणि 35 जागा मागणारी शिवसेना सुद्धा 28 तारखेपर्यंत 15 जागेवर तयार झाली होती. त्यानुसार शिवसेनकडून नीलम गोर्हे, विजय शिवतारे, रविंद्र धंगेकर, अजय भोसले, उल्हास तुपे, आबा बागुल यांनी एक 15 उमेदवारांची तयार केली.पण याच यादी मुळे भाजप- शिवसेनेत वाद विकोपाला गेला.
या यादीमध्ये प्रभाग क्रमांक 41 ब मधून प्रमोद नाना भानगिरे, 41 क स्वाती अनंत टकले, 24 ड प्रणव रवींद्र धंगेकर, 23 क प्रतिभा रविंद्र धंगेकर, 26 ड उल्हास उर्फ वसंतराव बागुल, 37 क गिरीराज तानाजी सावंत,37 ड रुपाली रमेश कोंडे, 38 क वनिता जालिंदर जांभळे , 38 इ स्वराज नमेश बाबर, 39 क मनिषा गणेश मोहिते, 6 ड आनंद रामनिवास गोयल, 3 क गायत्री हर्षवर्धन पवार, 16 ड उल्हास दत्तात्रय तुपे, 40 ड दशरथ पंढरीनाथ काळभोर किंवा गंगाधर विठ्ठल बधे, 11 क वैशाली राजेंद्र मराठे यांचे नावं होती.
पण या सगळ्या नावामधून प्रभाग क्रमांक 24 ड हे मूळ वादाचे कारण ठरले. कारण या जागेवरून भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर हे रिंगणात आहेत. आणि त्याच जागेवर रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर यांना उमेदवारी हवी होती. मात्र, या जागेवर भारजीय जनता पक्ष कोणतेही कॉम्प्रमाईज करायला तयार नव्हते. खरी वादाची ठिणगी इथेच पडली आणि सेना भाजपची युती ही फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली. आता शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी जरी युती तुटली नसल्याचं म्हटलं असलं तरी ना शिवेसना कॉम्प्रमाईजच्या मूडमध्ये आहे ना भारतीय जनता पक्ष. त्यामुळे तीन राखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीपर्यंत चेर्चेचे गुर्हाळ सुरूच राहणार असून कार्यकर्ते मात्र गॅसवर राहणार आहेत हे नक्की!.



Comments