top of page

सातारा जिल्हा परिषदेत राडा, पालकमंत्री शंभुराज देसाई जखमी; भाजप कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा आरोप

सातारा: जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रिया आज पार पडली. भाजपने मोठा विजय पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. आजच्या निवड प्रक्रियेला हिंसक वळण लागले. या निवडीदरम्यान झालेल्या प्रचंड गोंधळात पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या डाव्या हाताला जखम झाली असून त्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे सातार्‍याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असताना भाजपा आणि शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि ढकलाढकली झाली. या गर्दीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पत्रकारांसोबत बोलताना देसाई म्हणाले की, “ गर्दीत मला नेमका धक्का कसा लागला हे सुरुवातीला समजले नाही. मात्र जेव्हा हाताला जखम होऊन रक्त येऊ लागले, तेव्हा दुखापतीची जाणीव झाली. “ या घटनेनंतर देसाई समर्थक आक्रमक झाले असून, याचे तीव्र पडसाद उमटतील असा त्यांनी इशारा दिला.


या राड्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. “ पोलीस बळाचा चुकीचा वापर करून विरोधी सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. जर थेट मंत्री आणि लोकप्रतिनिधिंवरच पोलीस धावून येत असतील, तर ही होकशाहीसाठी अत्यंत गंभीर बाब आहे.” असे पाटील म्हणाले.


दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी प्रशासनावर टीका केली आहे,“ आमच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असतानाही पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने सभागृहाबाहेर काढले. प्रशासनाचा गैरवापर करून आमच्या सदस्यांवर दबाव टाकण्यात आला आणि त्यांना हात वर करण्यास भाग पाडले, असा खळबळजनक आरोप शिंदेंनी केला. “ आम्ही हा अन्याय सहन करणार नाही, आता याविरोधात रस्त्यावरची लढाई लढू” असा इशाराही त्यांनी दिला.

Comments


bottom of page