संसद परिसरात विरोधीपक्षांच्या खासदारांचे काळे कपडे घालून निदर्शने; दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकुब
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read

नवी दिल्ली : दिल्लीत आंदोलन करणारे तरुण आणि लोकप्रतिनिधींवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद परिसरात काळे कपडे घालून निदर्शने केली. त्यांनी केंद्रातील सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पंंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. या निदर्शनामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रसे खासदार प्रियांका गांधी वडेरा, समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचा सहभाग होता.
याबाबत बोलताना काँग्रेस खासदार के. सुरेश म्हणाले की, मंगळवारच्या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर खासदारांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आम्ही काळे कपडे परिधान केले आहेत. काल पोलिसांनी विरोधी पक्षनेते आणि इतर खासदारांना जी अमानुष वागणूक दिली, त्याविरोधात आज आम्ही सर्वजण काळे कपडे घालून ‘ मकर द्वार’ समोर निदर्शने केली.
समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव म्हणाले की, सरकार त्यांच्या मंत्र्याला का हटवू शकत नाही, याचे कारण काय? याचा आपण विचार केला पाहिजे. देशभरातील तरुणांकडून शिक्षणमंत्र्यांच्यवा राजीनाम्याची मागणी होत आहे. पण सरकारवर असा कोणता दबाव आहे की ते मंत्र्यांना हटवू शकत नाहीत. त्या मंत्र्याकडे सरकारची अशी काही गुपिते आहत का? जी उघड होतील , हे यामागील कारण आहे का? सरकार तरुणांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही.
आरजेडी खासदार संजय यादव यांनीही नीट पेपरफुटी आणि गेल्या50 वर्षांतील उच्चांकी बेरोजगारीच्या मुद्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेची मागणी करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांविरुद्ध सरकार दडपशाहीचा अवलंब करत असल्याच आरोप त्यांनी केला. यादव यांनी पुढे आसा दावा केला की, सरकार रेशन पुरवठा करत असल्याचा दावा करत असले तरी, त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे कोट्यवधी तरुण बेरोजगार झाले असून त्यांचे भविष्य अनिश्चित झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि शिक्षण व्यवस्थेवर चर्चा होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी स्पष्ट केली.
दोन्ही सभागृहात गदारोळ: संसदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज आधी दुपारी 12:00 वाजेपर्यंत आणि त्यानंतर 2:00 वाजेपर्यंत तहकुब करण्यात आले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे.
लोकसभेत बोलताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारची भूमिका मांडली. “ नीट पेपरफुटीच्या मुद्यावर सरकार चर्चेला तयार आहे. पहिल्या दिवसांपासून आमची हीच भूमिका राहिली आहे. पण ही चर्चा नियमांनुसारच झाली पाहिजे यावर चर्चा कधी होणार? त्यासाठी किती वेळ द्यावा आणि ती कोणत्या नियमांतर्गत केली जाईल, हे सर्व पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा केल्यानंतर निश्चित केले जावे. नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चा करण्यास सरकारची तयारी आहे. देशातील तरुणांच्या भविष्यासाठी विधायक चर्चा व्हायला हवी, अशी सरकारची इच्छा आहे” असे रिजिजू लोकसभेत म्हणाले.



Comments