अजित दादांचा मंत्र्यांना निर्वानिचा इशारा; .. तर त्यांची पदे इतरांना देऊ
- Navnath Yewale
- Sep 19
- 2 min read

नागपूर: उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूरमध्ये कार्यकर्ता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती. शिबीरास मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या सुलभतेसाठी सरकारने हैदराबाद गॅझेटिअर लागू केल्या पासून राज्यातलं सामाजिक वातावरण ढवळलं आहे. ओबीसी नेत्यांकडून सरकारच्या जीआरला विरोध होत आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अन्न व नगारी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट सरकारच्या जीआरला कडाडून विरोध करत ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप केला आहे. सरकारने जीआरमध्ये सुधारणा आणावी अन्यथा तो रद्द करावा अशी भूमिका घेत सरकारलाच घराचा आहेर दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ओेबीसी समितीचे अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हैदराबाद गॅझेटिअरच्या निर्णयामुळे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच आरक्षणाचा लाभ दिला जाणार असल्याचा वारंवार खुलासा केला आहे. परंतु छगन भुजबळ आपल्या सरकार विरोधी भूमिकेवर ठाम आहेत.
नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या शिबीरापूर्वी काल समता परिषदेच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी आपली भूमिका ठाम असल्याचे सांगत मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी येथील दोन वर्षापूर्वीच्या लठीचार्ज, हल्ला प्रकरणावरून शरद पवार यांच्यावर घणाघात केला. एवढंच नव्हे तर घटनेच्या पूर्वसंध्येला रात्री बैठक झाली ज्यामध्ये प्लॅन ठरला, या बैठकीत शरद पवार पक्षाचा एक माजी आमदार असल्याचे सांगत त्यांनी माजी मंत्री राजेश टोपे यांच्याकडे अंगूली निर्देश करत आम्ही त्याला निवडणूकीत पाडल्याचा दावाही केला. लाठीचार्ज नंतर शरद पवारांनी समावेशक भूमिका न घेता मनोज जरांगेची भेट घेतल्याचाही आरोपही भुजबळ यांनी केला.
सरकारच्या निर्णया विरोधात उघड भूमिका घेऊन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शिष्ठाईला न जुमानता छगन भुजबळ ओबीसी आरक्षण बचावासाठी मैदानात उतरले आहेत. समता परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात रॅली, मोर्चा, सभा, मेळाव्याचा इशारा भुजबळ यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमिवर 28 सप्टेंबर रोजी बीडमध्ये मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी नुकताच दिला आहे. प्रसंगी मुंबई, दिल्लीलाही जाऊ असंही भुजबळ म्हणाले. भुजबळ यांच्या भुमिकेने सत्ताधारी महायुतीसह विरोधी पक्षांच्याही भुवया उंचावल्या आहेत.
भुजबळ यांच्या शरद पवार यांच्यावरील आरोपांवर अजित पवार यांना प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी सारवा सारव करत “ भुजबळ यांनी असा गौप्यस्फोट का केला, ते मी त्यांनाच उद्या विचारेल. गौप्यस्फोट करण्या मागणचा त्यांचा उद्देश काय, हे मी विचारुन सांगतो ” कालच असा सावध पवित्रा घेतला होता. आज नागपूरमध्ये आयोजीत शिबीरास मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की, माझा मंत्रीमहोदयांना निर्वानिचा इशारा आहे. काही मंत्रिमहोदयांना पक्षापेक्षा इतर कामं जास्त असतील तर आपण त्यांच पद इतरांना देऊ, मग कळेल.. आम्ही राजकारणात आलो तेव्हा किंवा छगन भुजबळ राजकारणात आले तेव्हा अशी परिस्थिती नव्हती असही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांच्या वक्तव्यातून मंत्र्याचे नांव समोर आले नसले तरी हा निर्वानिचा इशारा निश्चितच छगन भुजबळ यांच्यासाठी होता असे बोलले जात आहे. त्यामुळे छगन भुजबळ आता काय भुमिका घेतात व अजित पवार त्यावर काय मार्ग काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


Comments