अधिवेशनाचा पहिला दिवस: भाजप तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आक्रमक, आमदार कृष्णा खोपडेंची लक्षवेधी
- Navnath Yewale
- 1 day ago
- 1 min read

नागपूर: नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप तुकाराम मुंडेच्या विरोधात आक्रमक दिसली. भाजप आमदारांकडून यावेळी तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. या प्रकरणी भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी याबाबत खुलासा केला आहे.
तुकाराम मुंडे कोविडच्या काळात नगापूर महानगरपालिकेत रुजू झाले, त्यामध्ये त्यांच्या सात महिन्याच्या कार्यकाळात गैरप्रकार केले. एखाद्या साईटवर ते गेले तर मीडियाला माहित होतं. मात्र संबंधित अधिकारी घरी झोपून राहत होता. तुकाराम मुंडे यांना स्मार्ट सिटीचे अधिकार दिले नव्हते. त्यांनी बिल्डर आणि वीस कोटी रुपयांच्या चेकवर स्वत: सही केली आणि बिल्डरच्या घशात टाकले. त्यावेळी महापौर असलेले संदीप जोशी आणि भाजप गट नेते संदीप जाधव यांनी बँकेच्या पुराव्यासहित सदर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याचे आमदार खोपडे म्हणाले.
स्मार्ट सिटीत महिला अधिकारी होते. त्यांनी सही करण्यास मनाई केली, त्यावेळी मुंडे यांनी त्या महिला अधिकार्यांना टॉर्चर केलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं की एखाद्या आयएएस अधिकार्याविरुद्ध दोन महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. परंतु त्यावेळी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं आणि देशमुख गृहमंत्री होते त्यामुळे त्यांच्या दबावाखाली काही होऊ शकले नसल्याचे भाजप आमदार म्हणाले.
दरम्यान, माहितीच्या अधिकारात आम्ही माहिती मागितली. त्यांना अधिकार नसतानाही पाच वर्षे त्या पदावर दाखवण्यात आलं, परंतु तसं असतानाही ते आदेश रद्द करण्याची मागणी आम्ही केली. आम्ही या विरोधात लक्षवेधी दाखल केलेली आहे. मुुंडे यांनी करोना काळात नागपूरचा कसा सत्यानाश केला. आता आम्ही लक्षवेधीच्या माध्यमातून तुकाराम मुंडे यांना ताबडतोब डिसमिस करावा आधि त्यांची चौकशी मुख्य सचिवाच्या माध्यमातून व्हावी अशी मागणी केल्याचंही आमदार खोपडे म्हणाले.



Comments