top of page

आंतरजातिय प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या, प्रेयसीने प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न!

मृतदेहाला हळद लावली, स्वत:ला हळद लावून, कुंकू, सिंदूर भरला.

ree

नांदेड : नांदेडमध्ये आंतरजातिय प्रेमसंबंधातून एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. प्रेयसीच्या वडिल व भावांनी मिळून तरुणाची हत्या केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे, मृत तरुणाच्या प्रेयसीने अंत्यसंस्कारापूर्वी स्वत:ला हळद लावली आणि कपाळावर कुंकू तसेच सिंदूर भरून चक्क प्रियकराच्या मृतदेहासोबतच लग्न केलं आहे.


नांदेडमधील जुना गंज परिसरात गुरुवारी (27 नोव्हेंबर) संध्याकाळच्या सुमारास दुसर्‍या जातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्यामुळे तरुणीच्या घरच्यांनी तिच्या प्रियकराची निर्घुन हत्या केल्याची घटना घडली. प्रकरणातील मृत तरुणाचं नाव सक्षम ताटे असे आहे. त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनी, भावांनी आणि मित्रांनी मिळून त्याला आधी गोळी झाडली आणि नंतर फरशीने डोक्यात वार करून त्याची अतिशय निर्घुणपणे हत्या केली.


पीडित सक्षमचे आचल नावाच्या तरुणीसोबत गेल्या तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. सक्षम हा आचलच्या भावाचा मित्र असल्याने आचलच्या घरी त्याचे नेहमी येणं-जाणं होत. दरम्यान, आचल आणि सक्षमचं एकमेकांवर प्रेम जडलं. परंतु, एके दिवशी आचलच्या भावाला आपल्या बहिणीच्या प्रेमसंबंधाबद्दल कळालं. खरं तर, सक्षम हा दुसर्‍या जातीचा असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. आचलच्या भावाने सक्षमला बहिणी पासून दूर राहण्याची ताकीद दिली होती. पण गुरुवारी संध्याकाळी तरुणीचे वडिल, भाऊ आणि त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून सक्षमला बेदम मारहाण केली. त्यावेळी, तरुणावर गोळी झाडून आणि डोक्यावर फरशीने वार करून निर्घुन हत्या केली.

आरोपींना फाशीची तरुणीची मागणी

सक्षमच्या हत्येनंतर आचल त्याच्या घरी पोहोचली आणि त्याच्या अंत्यसंस्कार होण्यापूर्वी तिने त्याच्या मृतदेहासह स्वत:ला हळद लावली, कपाळावर कुंकू, सिंदूर भरलं . या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. इतकेच नाही तर आचलने आपल्या आई-वडिल आणि भावांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील केली. ती म्हणाली की “माझ्या घरच्यांनी माझ्या प्रियकराला मारलं. तरीसुद्धा तो मरून जिंकला आहे आणि माझे वडिल, भाऊ हरले आहेत.” आता या प्रकरणातील आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात असून पोलिस घटनेचा तपास करत आहेत.


घटनेची माहिती मिळताच इतवारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून सक्षमच्या मृतदेहाचे विष्णूपुरीच्या शासकिय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. आचलचे वडिल, भाऊ यांसह इतर चार संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे.

Comments


bottom of page