top of page

दरवाढीचा भडका! पेट्रोल 18 रुपयांनी तर डिझेल 25 रुपयांनी महागणार?

भारतात व्यावसायिक सिलिंडरचा भाव काही दिवसांपूर्वी जवळपास 1000 रुपयांनी वाढला आहे. त्यानंतर आता पेट्रोल-डिझेलचे दरवढीचे संकेतही मिळत आहेत. सरकारी तेल कंपन्यांना दररोज 1000 कोटींचा तोटा बसत असल्याचे पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगत इंधन दरवाढीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल 18 रुपये, डिझेल 25 रुपयांनी महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेट्रोल- डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.



अखाती देशातील युद्धाचा परिणाम भारतावर जाणवू लागला आहे. देशात काही दिवसांपूर्वी व्यावसायिक सिलिंडरचा दर वाढला. जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमती वाढल्या. त्याचा थेट परिणात भारताच्या बाजापेठेवर झाला आहे. काही प्रमाणात पेट्रोल-डिझेलच्या दरातही वाढ झाली. त्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. यावेळी एका वर्षासाठी विदेश यात्रा, साने खरेदी करणे टाळण्याचेही मोदींनी आवाहन केले.


दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, ‘ आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल, नैसर्गिक वायू, एलपीजी चे दर वाढले आहेत. जागतिक पातळीवर कच्चा माल महाग झाला आहे, परंतु सामान्य जनतेला महागाईच्या झळा सहन कराव्या लागू नयेत, यासाठी देशात पेट्रोल- डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. सरकारी कंपन्यांना दररोज 1000 कोटी रुपयासंचा तोटा सहन करावा लागत आहे. चालू तिमाहीत तोटा 100000 कोटींच्या विक्रमी स्तरावर पोहोचण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.


तज्ज्ञांच्या मते, तेल कंपन्यांना प्रति लिटर पेट्रोलमागे सुमारे 18 रुपये आणि डिझेलमागे 25 रुपायांचा तोटा सहन करावा लागतो. या कंपन्यांना तोटा भरुन काढायचा असेल, तर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 18 रुपये आणि डिझेलच्या दरात 25 रुपयांनी वाढ करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरकार पेट्रोल- डिझेल दरवाढीबाबत काय निर्णय घेणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Comments


bottom of page