top of page

नांदेड महापालिका निवडणुक: भाजप उमेदवारीसाठी अशोक चव्हाणांनी 50 लाख घेतले- भानुसिंग रावत ; शिवसेना (शिंदे) गटाचे दोन अधिकृत उमेदवार पळवल्याचा आमदार कल्याणकरांचा आरोप


नांदेड : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आयाराम-गयारामांची संख्या वाढली असून बाहेरून आलेल्या लोकांना तिकिट दिलं जात असल्याचा आरोप सर्वच पक्षातून होत आहे. नांदेडमध्येही तशीच काहीशी स्थिती आहे. दरम्यान भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर उमेदवारीसाठी 50 लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप त्यांचे जुने सहकारी माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांनी केला आहे. या आरोपमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे भानूसिंग रावत यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी घेतल्याचा गंभीर आरोपही माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर केला आहे. अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केल्यानंतरही त्यांनी आपल्या कामाजी कदर केली नाही, ऐनवेळी उमेदवारीसाठी तिकीट कापले गेले. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी यांनी पन्नास लाख रुपये घेतल्याचा मोठा आरोप भानुसिंग रावत यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केला आहे.


भानूसिंग रावत यांनी यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 मधून आपल्या मुलासाठी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, ऐनवेळी पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर, भानुसिंग रावत यांनी अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दरम्यान उमेदवारी नाकारल्यानंतर रावत यांनी शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण हातात घेत मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून रावत यांचा मुलगा अक्षय सिंग रावत निवडणूक लढत आहे.


दुसरीकडे तिकीट कापले गेल्याने महिला आघाडीच्या प्रदेश सचिव महादेवी मटपती यांनीही अश्रू ढाळत अशोक चव्हाण यांनीच आपली उमेदवारी कापल्याचा आरोप केला. लग्न एकासोबत करायचं आणि मार्केटमध्ये दुसऱ्या नवऱ्या सोबत फिरायचं का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. पैशाचा विजय आणि आमचा पराभव झाला असे म्हणत त्यांनी पैसे घेऊन मटक्यावाल्याला उमेदवारी दिल्याचा आरोप केला. भाजपने शेवटच्या दिवशी एबी फॉर्म देत आपले उमेदवार घोषित केले. त्यात प्रभाग 9 मध्ये भाजपने मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी बहाल केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रभातील निष्ठावंत उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.


लातूर शहरात देखिल अशीच स्थिती आहे. येथे अनेक वर्षांपासून भाजपसाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. बाहेरच्या पक्षातून आलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. तर जुने कार्यकर्ते तिकीटापासून वंचित राहिल्याने असंतोष अधिक तीव्र झाल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपातील जुने, निष्ठावंत कार्यकत्यांच्या लातूर येथील कल्पतरू मंगल कार्यालयात झालेल्या  बैठकीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.


भाजपने दोन अधिकृत उमेदवार पळवल्याचा आरोप शिवसेना (शिंदे) गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी केला आहे. एबी फॉर्म जोडलेल्या उमेदवारांना पळवून भाजपाने निवडणुक प्रक्रियेला खिळ दिली आहे. उमेदवारांवर दबावतंत्राचा अवलंब करत त्यांना पळवून नेल्याचाही आरोप आमदार कल्याणकर यांनी केला आहे. 

 

Comments


bottom of page