top of page

नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरण; भाजपची चोहूबाजूने कोंडी!

प्रस्तावित निर्णयाविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही सरसावली.

नाशिक: नाशिकमध्ये 2027 मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यासाठी तपोवन मधील 1700 झाडं तोडणे, पुर्नरोपण करणे तसेच फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाला पर्यावरणप्रेमींसह नाशिककरांचा तीव्र विरोध आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. सरकारच्या भुमीकेवर शंका उपस्थित करत सयाजी शिंदे यांनी तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही असा सज्जड इशाराच दिला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, करुणा मुंडे एवढेच काय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सयाजी शिंदे यांची पाठराखन केली आहे. त्यातच आता शिवसेना (शिंदे) गटानेही वृक्षतोडीला प्रखर विरोध केल्याने महायुतीतील घटक पक्षांनीच प्रस्तावित निर्णयाला विरोध केल्याने भाजप चोहूबाजूने कोंडीत सापडले आहे.


सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीस तपोवनातील जवळपास 1700 झाडे तोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी तपोवनातील वृक्षतोड करावी लागणार असल्याचे सांगत एका वृक्षाच्या मोबल्यात दहा वृक्षांरोपन करण्याची अश्वासन दिले. मात्र, एक माणुस मारायचा आणि त्यास मुलगा भेट द्यायचा या प्रकारचा हा शासनाचा निर्णय असल्याचे म्हणत अभिनेते सयाजी शिंदे यांचा वृक्षतोडीला विरोध कायम आहे.


दरम्यान सयाजी शिंदे यांच्या भुमिकेचे सोशल मिडियावर स्वागत होत असून ज्या साधु-संताच्या निवासासाठी साधुग्राम उभारण्यात येणार आहे त्या साधुंना तरी वृक्षतोड मान्य आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मंत्री नितेश राणे यांनी हिंदू धर्माच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वृक्षतोडीला विरोध करणारे पर्यावरणप्रेमी बकरीईदच्या वेळेस कोठे असतात, बकरीईदच्या वेळेस सयाजी शिंदे यांनी बकरीच्या गळ्यात मिठ्ठी मारून पाहावी व बकरीची कत्तल थांबवावी असे म्हणत पर्यावरणाच्या प्रश्नामध्ये नवीन वादाला तोंड फोडण्याचा प्रयत्न केला मात्र, पर्यावरणप्रेमींनी मंत्री नितेश राणे यांना चांगलेच सोशल ट्रोल केले शिवाय तपोवनामधील आंदोलकांनी मंत्री नितेश राणे यांना चांगलीच खरी-खोटी सुनावली त्यामुळे पर्यावरणाला तुर्तास तरी धर्माची झालर लागली नाही.


तपोवनातील वृक्षतोडीचा निर्णय घेणार्‍या महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांची पाठराखन करत “तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते श्री सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाच समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे, पर्यावरण वाचलं तर पुढची पिढी सुरक्षित राहील, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे” असं आपल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘ एक्स’ वर पोस्टद्वारे म्हटलं आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तथा सुराज्यशक्ती पक्षाच्या करुणा मुंडे यांनी वृक्षतोडीस तीव्र विरोध दर्शवत थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सध्यातरी पर्यावरणप्रेमींचं पारडं जड वाटत असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन साधुग्रामसाठी तपोवन मधील वृक्षतोडीवर ठाम आहेत.


त्यातच आता महायुतीमधील शिवसेना (शिंदे) गटाकडूनही आंदोलनाने वृक्ष तोडीच्या प्रस्तावित निर्णयाला तीव्र विरोध करण्यात आला आहे. महायुतीतील घटक पक्षाकडूनच आंदोलने केले जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

आज तपोवन परिसरात शिंदे सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शेकडोच्या संख्येने एकत्र येत हातात वृक्ष तोडीला विरोध दर्शविणारे फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ‘ वृक्षतोड थांबवा अन्यथा तीप्र परिणाम भोगा’ असा इशारा देखील देण्यात आला. संतप्त कार्यकर्त्यांनी थेट करवत आणि कुर्‍हाड जाळून आपला संताप व्यक्त केला. या प्रतिकात्मक कृतितून ‘ वृक्ष तोडण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही’ असा ठाम संदेशच देण्यात आला.


आंदोलनाची तीव्रता लक्षा घेता, कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी तातडीने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. नाशिक शहर पोलिस आणि दंगल नियंत्रण पथकंही यावेळी तैनात करण्यात आले होते. आंदोलकांना नियत्रित ठेवण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू आहे. त्यामुळे हा वृतोडीचा वाद नेमके कोणते वळण घेतो, याकडे पर्यावरणप्रेमी, नाशिककरांचे लक्ष लागले आहे.


प्रशासनाची भूमिका संशयास्पद

हा मुद्दा संवेदनशील आणि अत्यंत महत्वाचा आहे. कोणीही या विषयात राजकारण आणू नये, ही झाडच राहिली नाही तर काय होईल. साधुसंतांना कुंभमेळा साजरा करण्यासाठी झाडेच लागतात, मला वाटत नाही की कोणीही साधू संत हे येथील झाड तोडून इथे साधुग्राम बांधण्यास तयार होईल. हा मुद्दा आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकू, आणि नाशिककरांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवू. एकदा आपण प्रशासनाशी बोला, प्रशासन नक्की काय करते आहे? प्रशासनाचा विचार काय? असा प्रश्न आपण त्यांना विचारा असे आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सागणार असून प्रशासनाची ही भूमिा संशयास्पद असल्याचा आरोप देखील यावेळी शिंदे सेनेचे नेते अजय बोरस्ते यांनी केला आहे.


महिलांनी वृक्षांना राख्या बांधल्या: यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या शिंदे सेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून ओवाळणी करून येथील वृक्षांना राख्या देखील बांधण्यात आल्या. सदर वृक्ष म्हणजे आमचे भाऊ असा संदेश देखील यावेळी देण्यात आला. तर हे झाड आमचे भाऊ असून याच्यावर कुठलीही कुर्‍हाड चालू देणार नसल्याची भूमिका देखील यावेळी शिंदे सेनेच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून घेण्यात आली.


मनसे आक्रमक: तपोवनातील वृक्षतोडीचा प्रस्तावित निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही रस्त्यावर उतरली आहे. शनिवारी दि.6 मनसे मोर्चा काढणार आहे. यामोर्चात विविध संघटना, पर्यावरणप्रेमींचा सहभाग असणार आहे. तपोवनातील वृक्षतोडीचा निर्णय घेणार्‍या महायुती सरकारमधील घटक पक्षांनीच सरकारच्या प्रस्तावित निर्णयाला विरोध दर्शविल्याने भाजपची चोहूबाजूने कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

Comments


bottom of page