नेपाळमध्ये निसर्गाचा कोप!, भोटेकोशी, त्रिशुली नदीला महापुरघरे, बस वाहून गेली; 1000 लोक वाहून गेल्याची भीती, 105 भारतीय नागरिकांचा समावेश
- Navnath Yewale
- 1 hour ago
- 4 min read

नेपाळमध्ये भोटेकोशी आणि त्रिशुली नदीला अचानक आलेल्या महापुराने हाहाकार माजवला, तिबेटमधून अचानक आलेल्या पुराच्या लाटेत जवळपास 1000 नागरिक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे 105 भारतीय पर्यटक बेपत्ता झाले असून यामध्ये मानसरोवरला जाणार्या 31 यात्रेकरूंचा समावेश आहे.
नेपाळमध्ये रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांमध्ये तिबेटच्या सीमाभागातून वाहणार्या भोटेकोशी आणि त्रिशुली नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी आपत्ती ओढावली आहे. या अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात शेकडो पर्यटक आणि स्थानिक नागरिक अडकले असून नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तब्बल 105 भारतीय पर्यटक सध्या बेपत्ता आहेत. चिंताजनक बाब म्हणजे यामध्ये पवित्र कैलास मानसरोवर यात्रेसाठी निघालेल्या 31 भारतीय भाविकांचा समावेश आहे. या घटनेमुळे भारतातील अनेक कुटुंबांची धाकधूक वाढली असून नेपाळ सरकार आणि लष्कराने युद्धपातळीवर शोध व बचाव मोहिम हाती घेतली आहे.
नेपाळ पर्यटन मंडळाच्या अधिकृत नोंदीनुसार, पुराच्या विळख्यात सापडून सुमारे 384 हून अधिक प्रवासी आणि पर्यटक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये 297 परदेशी पर्यटक असून 90 हून अधिक नेपाळचे स्थानिक रहीवासी आहेत. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, नेदलँड्स, अमेरिका, मलेशिया, युनायटेड किंगडम आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे नागरिकही या दुर्घटनेत अडकल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या भारतीयांपैकी 59 जण स्मार्ट ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून तर 46 जण लीफ हॉलिडेजच्या टूर पॅकेजद्वारे प्रवास करत होते.
दरम्यान, पुराचा तडाखा एवढा होता की रसुवा येथील तिमुरे भागातील सीमाशुल्क कार्यालयाचे 14 कर्मचारी (11 कायमस्वरुपी व 3 कंत्राटी) पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाले आहेत. सुदैवाने, कार्यालयाचे प्रमुख राजेंद्र ढुंगाना यांच्यासह 25 कर्मचार्यांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यात यश आले आहे. याशिवाय 20 मेगावॅट क्षमतेच्या लांगटांग खोला जलविद्युत प्रकल्पातील तब्बल 60 कामगार व अधिकारी बेपत्ता झाले असून संपूर्ण प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे.
भोटोकोशी नदीच्या या रौद्ररुपाने परिसरातील पायाभूत सुविधा पुरत्या उद्ध्वस्त केल्या आहेत. नुवाकोटमधील त्रिशुली बाजाराजवळील अंदाजे 60 घरे पुराच्या प्रचंड वेगाने वाहून गेली असून दोन मुख्य मोटारयोग्य पूल पूर्णपणे कोसळले आहेत. प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र देवघाट परिसरही या पुरामुळे गंभीररित्या बाधित झाला आहे. 300 हून अधिक वाहने पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय 25 -मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पाचे तीन महत्वाचे ब्लॉक आणि सबस्टेशन वाहून गेल्याने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा आणि संपर्क यंत्रणा खंडित झाली आहे.
बिहारच्या आठ जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा : नेपाळमध्ये पुराचा परिणाम आता भारतातही पोहचण्याची भाती आहे. या पार्श्वभूमिवर बिहारच्या आठ जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम चंपारण,
पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुजफ्फरपूर, वैशाली, सीतामढी आणि शिवहर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने गंडक नदीत अंदाजे 32 मीटर उंचीच्या अचानक येणार्या पुराच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. रसुवा येथील तिमुरेमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी पाठवलेले हेलिकॉप्टर न उतरता काठमांडूला परतले. स्थानिक हेलिपॅड पुराच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे पायलटला उतरण्यासाठी सुरक्षित जागा सापडली नाही. पायलटने‘ काठमांडू पोस्ट’ ला सांगितले की, तिमुरे गावाचा मोठा भाग वरून दिसत नव्हता. तो म्हणाला की, त्रिशुली नदीचे पाणी अचानक वेगाने वाढले, जणू काही अडवलेली नदी अचानक फुटली असावी.
रसुवामध्ये गेल्या 24 तासांत 7 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडलेला नाही, त्यामुळे स्थानिक पावसामुळे पूर आल्याचे मानले जात नाही. तिबेटमधील हिमनदी सरोवराच्या स्फोटामुळे थोटेकोशी नदीला अचानक पूर आला असावा. असा अधिाकर्यांचा संशय आहे. 2020 च्या आयसीआयएमओडी-यूएनडीपी अभ्यानुसार, भोटेकोशी खोर्यात 122 हिमनदी सरोवरे आहेत. नेमके कोणते सरोवर फुटले हे अद्याप निश्चित झालेले नाही, त्याचा उगमस्थान निश्चित करण्यासाठी उपग्रह प्रतिमा आणि तांत्रिक तपासणीचा वापर केला जात आहे. तिमुरेमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यताव आहे. मृतांची आणि नुकसानीची नेमकी संख्या सध्या निश्चित केली जात आहे.
चीनकडून महापुराची अधिकृत माहिती उशिरा: चीनकडून आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित माहिती वेळेवर सामायिक न केल्यामुळे नेपाळच्या सीमावर्ती भागात पुन्हा भीषण संकट ओढावले आहे. तिबेटमधील केरुंग परिसरता आलेल्या महापुराची अधिकृत पूर्वसूचना चीनने नेपाळला तब्बल 45 मिनिटे उशिरा दिली. त्यामुळे नेपाळच्या रुसवा जिल्ह्यातील टिमुरे परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि अनेक नागरिक पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशातच हा तयार झालेला कृत्रिम तला पूर्णपणे फुटला नसल्याचे समोर येत आहे.
चीनी मिडिया सीआरआयनुसार, तिबेटच्या केरूंग काऊंटीमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता अचानक पूर आला. नेपाळ आणि चीनच्या वेळेत 2 तास 15 मिनिटांचा फरक असल्याने, नेपाळच्या वेळेनुसार हा पूर सकाळी 8:15 वाजता आला होता. नेपाळला किमान 2 तास आधी सावध करणे सहज शक्य होते, ज्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचू शकले असते. मात्र, चीनच्या कोणत्याही अधिकृत यंत्रणेने किंवा अपत्ती व्यवस्थापन विभागाने नेपाळला याबाबत तात्काळ कोणतीही माहिती दिली नाही.
रसुवाचे प्रमुख जिल्हाअधिकारी (सीडीओ) नरेंद्र परियार यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9:00 वाजता स्थानिक नागरिकांनी केरुंगकडून महापूर वेगाने नेपाळच्या दिशेने येत असल्याचे पाहिले. म्हणजे चीनमध्ये पूर आल्यानंतर तब्बल पाऊण तासाने नेपाळला याची कुणकुण लागली. पूर्वसूचना नसल्यामुळे टिमुरे परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. नदीची पाण्याची पातळी अचानक वाढल्याने लोकांना घरातून बाहेर पड्याची संधीही मिळाली नाही आणि अनेकजण पुरात वाहून गेले.
चीनकडून सलग दुसर्या वर्षी माहितीची लपवाछपवी: आपत्तीची पूर्वसूचना न देण्याची चीनची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही याच नदीला आलेल्या महापुराच्या वेळी चिनी अधिकार्यांनी नेपाळला सतर्क केले नव्हते. नंतर तिबेट भागातील हिमतळे (ग्लेशियर लेक) फुटल्याने तो पूर आल्याचे उघड झाले होते. यंदाही पुराचे मूळ केरुंग भागातच आहे, मात्र त्याचे नेमके कारण चीनने अद्याप स्पष्ट केले नाही.
नेपाळ प्रशासनाने उपलब्ध माहितीनुसार, त्रिशूली आणि भोटेकोशी नदीच्या तटीय भागांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. चीनच्या सीमेमध्ये ज्या ठिकाणी नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेला होता. तेथे तयार झालेला कृत्रिम पाण्याचा साठा अद्याप पूर्णपणे वाहून गेलेला नाही. त्यामुळे पुन्हा मोठा पूर येण्याची शक्यता कायम असून प्रशासनाने सखल भागातील नागकिांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.



Comments