पडघ्यातील बोरिवली गावात रात्रभर ईडी, एटीएसचे संयुक्त छापेदहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत; अनेक घरावर धाड
- Navnath Yewale
- 7 hours ago
- 2 min read

ठाणे: पडघा येथील बोरिवली गावात ईडी आणि एटीएसकडून रात्रभर संयुक्त छापेमारी करण्यात आली. दहशवादी कृत्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कुख्यात बोरिवली गावात रात्री उशिरा ईडी आणि एटीएसच्या अधिकार्यांनी कारवाई केली. पडघ्यातील बोरिवली गावात रात्रभर अनेक घरांमध्ये धाडी टाकण्यात आल्या.
एका दहशवादाशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. दहशतवादी कृत्यांना अर्थ सहाय्य केल्याप्रकरणी ईडी, एटीएस तपास करत आहे. या तपासात पडघ्यातील बोरिवली गावात घरांवर मोठी कारवाई करण्यात आली. दहशवादी कृत्यांसाठी संशयास्पद पैशाची देवाण घेवाण झाली. त्याबाबत ईडीला काही माहिती हाती लागली होती. त्यातून त्यांनी बुधवारी रात्री या गावात छापेमारी केली.ईडीने महाराष्ट्र एटीएसच्या सहाय्याने ही संयुक्त करावाई केली.
या कारवाईमध्ये अनेक संशयास्पद घरांवर धाडी टाकण्यात आल्या. त्याठिकाणी आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी केली जात आहे. यावर्षी जून महिन्यात एटीएसने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने बोरिवली गावात छापेमारी केली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोरिवलीत काही स्लीपर सेल कारवाया करत असल्याची गोपनिय माहिती एटीएसला मिळाली होती. त्या आधारे या भागात एटीएसच्या पथकांची विविध प्रकारे चाचवणी सुरू होती. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकिब नाचणचे नातेवाईक आणि साथीदार अशा 22 जणांची माहिती मिळाली होती. त्याच आधारावर एटीएसने 22 पथके तयार करून 2 जून रोजी पहाटे 2 ते 3 वाजल्यापासून कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईत या 22 पैकी 16 जणांची चौकशी झाली होती.
देशविघातक कृत्यांसाठी दुसरी फळी बोरिवलीत तयार होत असल्याची माहिती एटीएसकडे होती. त्याच्या सहकार्यांकडून चिथावणीखोर आणि जिहादी भाषणे, सतेय साकिबला आदर्श मानणे आणि साकिबवरील कारवाईचा दिवस काळ दिवस म्हणून पाळणे, तसेच काही स्लीपर सेलही कार्यरत असणे, अशा अनेक संशास्पद हालचालींमुळे या ठिकाणी अनेकदा कारवाई झाली आहे. 2003 मध्ये मुलुंड, घाटकोपर रेल्वे स्थानकात झालेल्या बॉम्बस्फोटामुळे पहिल्यांदा हे गाव प्रकाशझोतात आले. या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड म्हणून साकिब नाचण आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती. साकिब नाचण व त्याच्या साथीदारांनी पडघा गावाला स्वतंत्र गाव किंवा मुक्त विभाग असे घोषित केले होते, तसेच अनेक मुस्लीम तरुणांना पडघा येथे राहायला आणण्यासाठी ते प्रयत्नशील होते.



Comments