top of page

बांगला देशात हिंसाचाराचा उद्रेक, प्रसिद्ध गायकाच्या ‘रॉक कॉन्सर्ट’वर जमावाचा हल्ला


बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंचाराच्या घटना घडत आहेत. या हिंसाचारात हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. यातच आता कट्टरपंथी जमावाने प्रसिद्ध रॉक संगितकार जेम्स यांच्या संगीताच्या कार्यक्रमावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे आयोजकांना हा कार्यक्रम रद्द करावा लागला. या घटनेत किमान 20 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

नगर बाऊल म्हणून ओळखले जाणारे बांगलादेशचे सर्वात मोठे रॉकस्टार जेम्स हे फरिदपूर जिल्हा शाळेच्या 185 व्या वर्धापन दिनानिमीत्त अयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात गायन करणार होते. हजारो विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ही मॉन्सर्ट होणार होती. मात्र कार्यक्रम सुरू होण्याच्या काही मिनिटे आधीच तो रद्द करावा लागला. हल्लेखोरांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी घुसून एकच गोंधळ घातला. कार्यक्रमस्थळावर दगडफेक करण्यात आली ज्यामध्ये काही जण जखमी देखील झाले आहेत.


अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जेम्स हे रात्री साडे नऊच्या सुमारास स्टेजवर जाणार त्याच्या काही मिनिटांपूर्वी बाहरेच्या एका मोठ्या गटाने कार्यक्रमाच्या ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आयोजक आणि सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा जमाव हिंसक झाला.


यावेळी स्टेज आणि प्रेक्षकांच्या दिशेने विटा आणि दगड फेकण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण मैदानात एकच खळबळ उडाली आणि भतीचे वातावरण पसरले. या घटनेत जखमी झालेले बहुतांश जण हे शाळेचे विद्यार्थी आहेत.


या दगडफेकीमध्ये अनेकांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत. दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांनी हल्लेखोरां विरोध केल्याचेही सांगितले जात आहे. या गोंधळाच्या आणि तणावाच्या परिस्थिती विद्यार्थ्यांनी अखेर त्या हल्लेखोरांना शाळेच्या परिसरातून पळवून लावले.


दरम्यान परिस्थिती हाताबाहेर गेल्याने जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धव घेतली. रात्री 10 च्या सुमारास आयेाजन समितीचे निमंत्रक डॉ. मोस्ताफिजुर रहमान शमीम यांनी स्टेडवरून जाहीर केले की, कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत फरीदपूर जिल्हा प्रशासनाच्या सूचनांनुसार संगीताचा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे.


गायक जेम्स हा या घटनेत थोडक्यात बचावला. गोंधळाच्या परिस्थितीमध्ये त्याला सुरक्षितपणे दूर घेऊन जाण्यात आले. कलाकार किंवा त्यांच्या बँडमधील कोणत्याही सदस्याला कसलीही दुखापत झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.


स्थानिकांनी दिलेल्या महितीनुसार हल्लेखोरांनी संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाला विरोध केला होता. असे कार्यक्रम थांबवले पाहिजेत अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. हल्लेखोरांची ओळख किंवा ते काणत्या संघटनेशी संबंधित होते याबद्दल अद्याप अधिकृतपणे प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही.


ही कॉन्सर्ट रद्द झाल्यानंतर पोलिसांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता. आणि रात्री उशिरा परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाल्याची माहिती नाही.

Comments


bottom of page