top of page

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचा मोठ्या शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने आज सोमवारी (दि.6) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, धनंजय मुंडे,चेतन तुपे, अनिल पाटील, सना मलिक आदींसह महायुतीचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज सोमवार (दि.6) शेवटचा दिवस. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहिर करण्यात आले असले तरी काँग्रेसकडून मात्र उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आला आहे. निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, निवडणूक लढवणे हा संविधानीक हाक्क असल्याचे सांगत उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम असलेले ओबीसी नेते यांनी माघार घेतली असली तरी आज अंतिम दिनी 19 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांनी आज मोठ्या शक्तीप्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्या म्हणाल्या की, “ संपूर्ण बारामती माझे कुटुंब आहे” अजित पवारांचा विकासाचा वारसा पुढे नेण्याची प्रतिज्ञा केली.


बॅनरने वेधले लक्ष : सुनेत्रा पवार यांनी आज आपला अर्ज भरला. त्यांनी अर्ज भरण्यापूर्वी बारामतीच्या प्रशासकीय इमारतीवर एका बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं. या बॅनरची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.


बारामतीमध्ये अज्ञात व्यक्तींनी हा बॅनर लावला. बॅनर लावणार्‍यांनी आपली ओळख “ समस्त दादा प्रेमी” अशी सांगण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यसांचा एकेरी उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांच्या विरोधातील मजकूर यावर लिहिण्यात आला आहे.


“ अजितदादांचे फक्त नावच पुरेसं आहे!” असं ठसठशीत अक्षरात लिहिण्यात आलं आहे. याच बॅनरवर पुढील ओळीमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा घातकी असा उल्लेख करण्यात आला आहे.“ घातकी तटकरे, पटेलची गरज नाही.,” असं या बॅनरवर शेवटच्या ओळीमध्ये लिहिलं होतं.

सुनेत्रा वहिनींना अर्ज भरण्यापूर्वी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला. यात सुनेत्रा पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. भाषण करीत असताना त्या भावूक झाल्या. त्या म्हणाल्या की, “ दोन महिन्यांआधी अजितदादांना गमावलं. अजितदादा आपल्यात नाहीत, असं आजही वाटत नाही. मला स्वप्नातही वाटत नव्हतं, की बारामतीची पोटनिवडणुक होईल. अजितदादांनी शेवटचा श्वासही बारामतीत घेतला, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. बारामतीकरांकडेच बघूनच मला धीर आला,” असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.


सुनेत्रा पवार यांनी बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न सुरू असतानाही काँग्रेसने उमेदवार दिला असून अनेक अपक्ष आणि इतर लहान पक्षांचे असे मिळून या लढतीत एकूण 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केला असल्याने ही निवडणूक रंजक होणार आहे.


ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची माघार : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीमधील पोट निवडणुक बिनविरोध होऊ देणार नाही अशी घोषणा केली होती. मात्र आज अर्ज भरण्याच्या दिवशी लक्ष्मण हाके यांनी आपली तलवार म्यान केली असून त्यांनी बरामती पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं जाहिर केलं. याबाबत दत्तात्रय भरणे यांनी मध्यस्थी केली.


काँग्रेसचा उमेदवार रिंगणात: बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने अ‍ॅड आकाश मोरे यांना रिंगणात उतरवले आहे. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात धनगर समाजाचा चेहरा म्हणून मोरे यांना संधी देण्यात आली. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल लागणार आहे.

Comments


bottom of page