top of page

भाजप आमदार सुरेश धस दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला

ree

बीड: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काल अचानक दिल्ली गाठली. नगरपरिषदेसाठीचे मतदान पार पडल्यानंतर सुरेश धस दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी गृहमंत्री शाह यांची भेट घेतली. ही भेट मतदारसंघ आणि जिल्ह्यातील विकास कामांसाठी होती, असा दावा धस यांच्याकडून केला जात आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पाच दिवसांपूर्वी एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने धस यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.


संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी आणि त्याचा बचाव करण्याचा आरोप असलेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची उणीव भासत असल्याचे केलेले विधान यावरून बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले होते. सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महिनाभरापूर्वी धनंजय मुंडे यांनी आपल्या खुनाचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप केला होता.

त्यानंतर सुरेश धस यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. हा सगळा घटनाक्रम पाहता सुरेश धस यांनी काल गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत घेतलेली भेट केवळ विकास कामांसाठीच होती की या भेटीत महाराष्ट्रसह देशभरात व दिल्लीतही चर्चा झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी होती? याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे.


ree

दरम्यान, सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपींच्या अटकेसाठी मोठे आंदोलन राज्यभरात न्याय मोर्चाच्या माध्यमातून उभे केले होते. या राजकीय दबावातून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड व इतर आरोपींना अटक झाली होती.


तत्कालीन राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड यांच्याशी असलेले संबंध, कृषिमंत्री असताना शेती अवजारे व औषधी साहित्य खरेदी घोटाळा, पिक विमा घोटाळा अशा प्रकारचे आरोप करत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला होता.


सरपंच संतोष देशमुख यांचे खंडणीतून झालेले अपहरण आणि त्यानंतर करण्यात आलेली क्रुर हत्या प्रकरणानंतर सुरेश धस हे गेल्या वर्षभरापासून कायम राज्याच्या राजकारणात चर्चेत राहणारे आमदार ठरले होते. धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीतील भ्रष्टाचार आणि गैरकारभाराचे आरोप धस यांनी केले होते.


हा सगळा घटनाक्रम आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी, त्यांचा बचाव करणार्‍या नेत्यावर कठोर कारवाई करा, अश मागणी बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे, पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रीया सुळे यांनीही यापूर्वी अमित शाह यांना पत देऊन व प्रत्यक्ष भेटीत केली होती. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी काल दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्याने वेगळ्या चर्चांना उधान आले आहे.


स्वत: सुरेश धस यांनी मात्र ही भेट आष्टी विधानसभा मतदार संघातील पर्यटन व धार्मिक विकास कामांसाठी होती असे म्हटले आहे. आष्टी मतदार संघात अनेक प्राचीन, ऐतिहासिक तसेच धार्मिकदृष्ट्या महत्पपूर्ण स्थळांचा समावेश आहे. दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक येथे दर्शनासाठी व पर्यटनासाठी येत असतात. या ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे अपेक्षित प्रमाणात विकास साधता आलेला नाही. ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे.


धार्मिक पर्यटन स्थळांचा सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणारी “ प्रसाद योजना” ( तिर्थयात्रा पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक संवर्धन मोहीम) ही अत्यंत महत्वपूर्ण आणि परिणामकारक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून आष्टी, पाटोदा आणि शिरुर कासार तालुक्यातील एकून 50 तिर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत मी केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्याकडे औपचारिक मागणी केली आणि यासंदर्भात सविस्तर भेट घेऊन चर्चा केली.


या चर्चेदरम्यान संबंधित विभागामार्फत तातडीने निधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांना गती देण्याची विनंती केली. आष्टी मतदारसंघातील धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन वारशाचा विकास व्हावा, तसेच भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहील, याची मी नगारिकांना खात्री देतो, असे सांगत धस यांनी या भेटीबाबत माहिती देणार्‍या अपाल्या सोशल मिडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Comments


bottom of page