महामानवाला अभिवादन! मुख्यमंत्री फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थणा, प्रधानमंत्री मोदींनीही वाहिली आदरांजली
- Navnath Yewale
- 3 days ago
- 2 min read

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजालादिशा देतो. भारताची सार्वभौमता राज्यघटना बाबासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केली आहे. या संविधानाच्या बळावरच देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळतो आणि देशाचा कारभार लोकशाही मार्गाने चालतो. या महामानवाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण राज्यासह देशभारातून बाबासाहेबांचे अनुयायी मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चैत्यभूमी दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री अॅड. आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाट व इतर मान्यवर उपस्थित होते.
मु÷ख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘ संविधान अमृत महोत्वी वर्षा निमित्त’ ‘डिजिटल संविधान चित्ररथा’ चे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री अॅड. आशिष शेलार व इतर मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी केलं बाबासाहेबांना अभिवान
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण देशाने त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदी यांनीही त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करतो. त्यांचे दूरदर्शी विचार, न्याय आणि समानतेसाठी अढळ वचनबद्धता आणि संवैधानिक मूल्यांनी भारताच्या विकास प्रवासाला आकार दिला आहे. आंबेडकरांनी भावी पिढ्यांना मानवी प्रतिष्ठा आणि लोकशाही आदर्शांना बळकट करण्यासाठी प्रेरित केले. विकसित भारताच्या उभारणीत बाबासाहेबांचे विचार आपला मार्ग उजळवत राहावेत.

राष्ट्रपती मुर्मू यांनी आंबेडकरांना वाहिली पुष्पांजली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतली संसद भवन संकुलातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली. राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत ‘ एक्स’ खात्यातून प्रसिद्ध झालेल्या संदेशात त्यांनी म्हटले की, मी बाबासाहेबांना आदर आणि श्रद्धांजली वाहते. आंबेडकरांची शिकवण आणि त्यांचा संघर्ष भारतात न्याय्य, समतावादी समाज निर्माण करण्याच्या प्रयत्नात आपल्याला मार्गदर्शन करत आहे. दरवर्षी 6 डिसेंबर हा दिवस संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि आधुनिक भारताचे महान विचारवंत डॉ. आंबेडकर यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले आणि हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. बौद्ध तत्वज्ञानानुसार, परिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरची पूर्ण मुक्ती, म्हणजे सर्व इच्छा, आसक्ती आणि सांसारिक आसक्तींपासून पूर्ण मुक्तता. ही सर्वोच्च अवस्था खूप कठीण मानली जाते आणि ती केवळ सद्गुणी आणि शिस्तबद्ध जीवनाद्वारे प्राप्त करता येते.



Comments