महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय
- Navnath Yewale
- Sep 13
- 1 min read
आता ओळखपत्राशिवाय सरकारी कार्यालयात प्रवेश बंद

मुंबई ,(वृत्त मानस सेवा ) : राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता कोणत्याही सरकारी कार्यालयात गळ्यात ओळखपत्र (Identity Card) घातल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. यामागचा उद्देश म्हणजे कार्यालयीन शिस्त व सुरक्षेला प्राधान्य देणे हा आहे.
अनेकदा सरकारी कार्यालयांत बाहेरील अनधिकृत व्यक्ती येऊन बसणे, कागदपत्रांची उचल–पटक करणे, कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास देणे अशा तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही ही बाब महत्त्वाची असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
या निर्णयानुसार सर्व सरकारी कर्मचारी व अधिकारी यांनी ड्युटीवर असताना आपले अधिकृत ओळखपत्र गळ्यात घालणे बंधनकारक राहील. तसेच नागरिकांना कामानिमित्त कार्यालयात प्रवेश हवा असल्यास प्रवेशद्वारावर नोंद करून तात्पुरते ‘व्हिजिटर पास’ घेणे आवश्यक असेल.
यामुळे कोण कोणत्या उद्देशाने कार्यालयात येत आहे, कोणत्या विभागात गेला आहे याची अचूक नोंद ठेवणे सुलभ होईल. शासनाने सर्व विभागप्रमुखांना या नियमाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
राज्य शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह असून कार्यालयातील कामकाजात पारदर्शकता आणि सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिक व कर्मचारी यांच्याकडून व्यक्त होत आहे.



Comments