top of page

राष्ट्रवादी (अ.प.) गटांतर्गत राडा?; मोठ्या नेत्याचे अपहरण, बेदम मारहाणीनंतर सुटका

नांदेड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां लोकशाहीचा उत्सव सुरू असताना अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत. गुन्हेगारी,खून, दरोडे, अपहरण, महिला अत्याचारांसारखे प्रकरण घडत असतानाच आज नांदेडमध्ये राजकीय क्षेत्राला हादरवणारी धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादीचे नेते मनपाचे माजी विरोधी पक्षनेता तथा पक्षाचे प्रदेश महासचिव जीवन पाटील घोगरे यांच्या वाहनांवर सिडको येथील ज्ञाणेश्वर नगरात प्रथम दगडफेक करण्यात आली. यानंतर काही अज्ञातांनी दुसर्‍या वाहनातून त्यांचे अपहरण केल्याची माहिती आहे. फिल्मीस्टाईल अपहरणाची घटना दुपारी 12:45 च्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात या घटनेने नांदेडसह राज्यात खळबळ उडाली आहे.राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये बर्‍याच दिवसांपासून अंतर्गत वाद निर्माण झाला होता. या वादाचे रुपांतर राड्यात झाल्यानेच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.



राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेश महासचिव जीवन घोगरे पाटील यांच्या वाहनांवर दगडफेक करून त्यांचे दुसर्‍या वाहतून अपहरण केल्याची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक ओकांत चिंचोळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्ञाणेश्वर नगर येथील सीसीटीव्ही खंगाळून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाची चौकशी करून घटनेच्या अवघ्या दोन तासात पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. जीवन पाटील घोगरे यांचे काही जणांसोबत आर्थिक व्यवहार होते. यातून झालेल्या नाराजीमधून त्यांच्या वाहनावर आधी दगडफेक झाली. यानंतर दुसर्‍या वाहनातून घोगरे पाटील यांना नेण्यात आले. अशी माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक चिंचोळकर यांनी शोसल मिडीयाच्या माध्यमातून पोस्टद्वारे दिली आहे.


राष्ट्रवादीचे नेते जीवन घोगरे पाटील यांच्या अपहरणाची बातमी शहरात वार्‍यासारखी पसरली. कार्यकर्त्यांनी घोगरे पाटील यांना मोबईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा मोबाईल बंद होता. घोगरे पाटील यांना अपहरणकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचेही वृत्त आहे. मारहाणीनंतर घोगरे पाटील यांना सोडून देण्यात आले. अपहरणापूर्वी घोगरे पाटील यांच्या वाहनांवर समोरून जोरदार दगडफेक करण्यात आली या हल्ल्यात त्यांच्या चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर अज्ञातांनी पांढर्‍या रंगाच्या वाहनातून घोगरे पाटील यांचे अपहरण केले. ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच अवघ्या दोन तासात सीसीटीव्ही फुटेच्या आधारे छडा लावून प्रकरणाचा उलगडा केला. मात्र, तोपर्यंत राज्यभरता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे अपहरणाची बातमी वार्‍यासारखी पसरली त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. जीवन घोगरे पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Comments


bottom of page