विधानपरिषद निवडणुक: तटकरेंचा मोठा डाव, पुत्र अनिकेत तटकरे होणार आमदार!

विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस, त्यामुळे बंडखोर नेत्यांची मनधरणीची पराकाष्टा करण्यात येत आहे. नाशिक विधानपरिषदेची निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या जागेवरुन गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, एकीकडे महायुतीत काही जागांवर बंडखोर निवडणुक लढवण्यावर ठाम असताना दुसरीकडे ठाण्यापाठोपाठ रायगड जागेसाठी महायुतीला मोठे यश आले आहे. येथे रायगडची जागा बिनविरोध होणर असून या जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ठाणेपाठोपाठ आता कोकणातील रायगड ही जागा आता बिनविरोध होणार आहे. ही जागा बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला सुटली होती. राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सुनिल तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांच्या विरोधात कोणताही उमेदवार निवडणुकीसाठी उभा नाही. त्यामुळे आता ही जागा बिनविरोध होणार आहे.
रायगड ची जागा मिळविण्यासठी महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच झाल्याचे पहायला मिळाले. हीजागा आम्हालाच मिळावी यासाठी शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांनी ताकद लावली होती. काहीही झालं तरी ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे, असे या नेत्यांचे मत होते. परंतु शेवटी ही जागा राष्ट्रवादीला मिळाली. त्यानंतरही शिवसेनेचे नेते आक्रमक झाले होते. राष्ट्रवादीला जर ही जागा जात असेल तर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आम्हाला म्हणजेच शिवसेनेला मिळायला हवे, असे मत गोगावले तसेच शिवसेनेच्या इतर नेत्यांनी व्यक्त केले. तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना आमदारकी देण्याच्या बदल्यात गोगावले यांना पालकमंत्रिपद दिले जाईल, असे ठरल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता काय होणार हे पाहावे लागणार आहे.



Comments