top of page

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक जाहिर केंद्रीय निवडणुक आयोगाची घोषणा; महाराष्ट्राला मिळणार 17 नवे आमदार

मुंबई : केंद्रीय निवडणूक अयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक घोषित केली आहे. मागील काही वर्षांपासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ही निवडणुक होणार आहे. यातील 16 जागा या नियमित आहेत तर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.


या निवडणुकीसाठी 25 मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 1 जून अंतिम तारीख असून 2 जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 4 जून अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत आहे. तर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि 22 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे.


महाराष्ट्रात 2020 पासून कोवीड आणि ओबीसी आरक्षण यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून जाणार्‍या विधानपरिषदेतील 17 जागा टप्प्या-टप्प्याने रिक्त झाल्या आहेत. आता 20 जिल्हा परिषदा वगळता राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुका संबंधित मतदारसंघातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती मतदान करतात. त्यामुळे इथले संख्याबळ निर्णायक भूमिका बजावते. 20 जिल्हा परिषदांची निवडणुक झाली नसली तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या 75 टक्के वा त्यापेक्षा अधिक आहे.



त्यामुळे नियमानुसार तिथे निवडणुक होण्यात कोणतीही अडचण नाही. आज घडीला पुणे, सोलापूर, सातारा- सांगली आणि रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग या 4 जागांवर 100 टक्के मतदार आहेत. तर जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित असलेल्या 24 जिल्ह्यांत नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका इथल्या मतदारांची संख्या 75 टक्क्यांच्या वर आहे.


रिक्त 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ : ऑगस्ट 2025 छत्रपती संभाजीनगर-जालना, नोव्हेंबर 2024 नागपूर, जून 2024 बीड-उस्मणाबाद-लातूर, परभणी- हिंगोली, नाशिक , अमरावती , वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली,रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग, डिसेंबर 2022 पुणे, ठाणे- पालघर , सांगली- सातारा, जळगाव, नांदेड, यवतमाळ, भंडारा- गोंदिया. जानेवारी 2022 सोलापूर, अहमदनगर (अहिल्यानगर)

Comments


bottom of page