व्हायरल व्हिडिओ प्रकरण: माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता- उपमुख्यमंत्री पवार
- Navnath Yewale
- Sep 5
- 2 min read

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अखेर व्हायरल व्हिडिओवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या कुर्डू गावात बेकायदा मुरुम उत्खणनावर कारवाई थांबविण्यासाठी गावातील काहींनी थेट अजित पवारांना फोन केला होता. त्यावेळी, अजित पवारांनी त्याठिकाणी असेलेल्या आयपीएस महिला अधिकारी अंजली कृष्णा यांना फोनवरुन कारवाई थांबविण्याचे आदेश दिले होते. तसेच, आपकी इतनी डेरिंग असे म्हणत दादागिरीचीही भाषा केली होती. त्यामुळे कर्तव्यदक्ष आणि रोखठोक असलेल्या अजित पवारांवर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली. महिला पोलिस (आयपीएस) अधकिर्याचा असा अवमान योग्य नसल्याचंही अनेकांनी म्हटलं. आता, अजित पवारांनी या व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पोलिस अधिकार्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलिस दलाबद्दल तसेच धैर्यानं आणि प्राामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणार्या महिला अधिकार्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच, मी पारदर्शक प्रशासकीय आरभारासाठी आणि बेकायदेशीर वाळु, माती, खडक उत्खणनासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटीबद्द आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
गावातील मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरिक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र, त्यांना अजित पवारांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल राहा हूँ. ये कार्यवाही बंद करो.. मेरा आदेश है.. त्यावर कृष्णा म्हणतात मरे फोन पे कॉल करे.. त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंबा.. इतनी डेरिंग है तुम्हारी.. मेरा चेहरा तो पेहचानोगी ना.. असे अजित पवार रागवलेल्या सुरात बोलले. त्यानंतर अजित पवारांनी व्हिडिओ कॉल केला . या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून अजित पवारांनी आता स्पष्टीकरण देत महिला पोलिस अधिकार्याची पाठराखण केली आहे.



Comments