आमदाराच्या लॉकरमध्ये कुबेराचा खजिना, इडीच्या अधिकार्यांना आली भोवळ !
कर्नाटकच्या बेंगळूरूमध्ये ईडीची मोठी कारवाई, 50.33 कोटींची सोन्याची बिस्कीटे जप्त

भारत सरकारच अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने कर्नाटकातील बेंगळुरू मध्ये मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या कारवाईत तब्बल 50.33 कोटींची सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने आज बेंगळुरू झोनल ऑफिसमार्फत मनी लॉन्ड्रींग प्रतिबंधक कायदा अंतर्गत काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र आणि इतरांविरुद्ध बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजीच्या प्रकरणात शोध मोहिम राबवली.
या छाप्यात चल्लेकेरे येथील दोन लॉकरमधून 24 कॅरेट सोन्याचे सुमारे 40 किलो बिस्किटे जप्त करण्यात आली असून, त्याची अंदाजे किंमत 50.33 कोटी इतकी आहे.
यापूर्वीही ईडीने या प्रकरणात 103 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. ज्यात सुमारे 21 किलो सोन्याचे बिस्किटे, रोकड, सोने-चांदीचे दागिने, बँक खाती आणि उच्च श्रेणीची वाहने यांचा समावेश होता. अशा प्रकारे या प्रकरणातील एकून जप्तीची रक्कम आतापर्यंत 150 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.
ही शोधमोहीम आणि गुन्ह्यातून मिळालेल्या अवैध पैशाचा मागोवा घेण्याची प्रक्रिया मुख्य आरोपी के. सी. वीरेंद्र ( आमदार, चित्रदुर्ग जिल्हा) याच्या न्यायालयीन कोठडीत असताना करण्यात आली .
ईडीच्या तपासात उघड झाले आहे की, के. सी. वीरेंद्र यांनी आपल्या कुटुंबीय आणि मित्रांच्या मदतीने अनेक बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी वेबसाइट्स जसे किंग 567, राजा 567 इत्यादी चालवल्या. या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य लोकांची फसवणूक केली.
खेळाडूंकडून जमा होणारा पैसा फोन पैसा सारख्या विविध पेमेंट गेटवेद्वारे जमा केला जात असे. त्यानंतर हा पैसा देशभरातील विविध‘ म्युल अकाउंट्स” म्हणजे इतरांच्या नावावर तयार केलेले बोगस खाती यांच्या माध्यमातून फिरवला जात असे.
ईडीच्या तपासात असेही आढळले आहे की या ऑनलाइन सट्टेबाजी अॅप्सचा संबंध देशभरातील काही सायबर गुन्ह्यांशी आहे. गुन्हेगारांनी लहानशा मोबदल्यात व्यक्तीच्या नावाने बनावट खाते उघडून घेतली आणि त्यांचा वापर पैसे वळवण्यासाठी केला. या बेकायदेशीर सट्टेबाजी वेबसाइट्सचा एकून आर्थिक व्यवहार 2000 कोटीं पेक्षा जास्त असल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
के.सी. वीरेंद्र, त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी यांनी परदेश प्रवास, व्हिसा, आणि आतिथ्य सेवांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. आणि हा सर्व खर्च या म्युल आकाउंट्समधून वळवलेल्या पैशातूनच करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. याशिवाय मार्केटिंग, बल्क एसएमएस सेवा वेबसाइट होस्टिंग, सर्च इंजिन ऑप्टीमाझेशन इत्यादींसाठीचा खर्चही के. सी. वीरेंद्र आणि त्यांच्या सहयोगींनी या खात्यांमधूनच भागवला. ईडीच्या पुराव्यानुसार या व्यवहारांसाठी वापरलेले पैसे बेकादेशीर ऑनलाइन सट्टेबाजीमधून आले होेते. आणि त्यांचा स्त्रोत लपवण्यासाठी हे पैसे अनक मध्यस्थ खात्यांमधून वळवले गेले.



Comments