भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर, अनेक हायप्रोफाइल चेहर्यांना डच्चू; आठवले कम बॅक, विनोद तावडेंना संधी, दोन उमेदवारांचे धक्कातंत्र
- Navnath Yewale
- Mar 4
- 2 min read

मुुंबई : भाजपकडून महाराष्ट्रातील राज्यसभेत 4 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, नागपूरच्या माजी महापौर माया ईवनाते आणि माजी आमदार रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यातील आठवले आणि तावडे यांना उमेदवारी अपेक्षीत होती. पण इवनाते आणि वडकुते यांच्या उमेदवार्या धक्कातंत्र मानले जात आहे.
भाजपकडून राज्यसभेसाठी 25 नावांची यादी कोअर कमिटीच्या बैठकीत अंतिम करण्यात आली होती. स्वत: प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली होती. यात नवनीत राणा, हंसराज अहिर, अशोक नेते, रावसाहेब दानवे, भागवत कराड, विजया रहाटकर, प्रितम मुंडे, धैर्यशील पाटील, विनय सहस्त्रबुद्धे, भारती पवार, दिलीप कांबळे, अमर साबळे, कुणाल पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर अशा अनेकांची नावे होती. पण या सर्व नवांना मागे टाकत ईनवाते आणि वडकुते यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे.
दरम्यान, माया ईवनाते या नागपूरच्या माजी महापौर असून सध्या विद्यमान नगरसेविकाही आहेत. तसेच राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या त्या सदस्याही आहेत. त्यांच्यारुपाने भाजपने आदिवासी समाजातील महिलेला राज्यसभेत पाठविले आहे. तर वडकुते हे हिंगोलीतील असून विधान परिषदेचे माजी आमदार आहे. ते भाजपचे हिंगोली लोकसभा निवडणूक प्रमुख होते. भाजपने त्यांच्यारुपाने धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडाळाचे माजी अध्यक्षही आहेत.
विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा मागील काही निवडणुकांमध्ये सातत्याने होती. मात्र, त्यावेळी त्यांना संधी मिळाली आहे. पक्षसंघटनेत मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर तावडेंनी आपला ठसा उमटविला आहे. सदस्य नोंदणीची विक्रमी कामगिरी करत त्यांनी आधीच पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर ते प्रभारी असताना बिहार, हरियाणामध्ये पक्षाला मिळालेला ऐतिहासिक विजयही तावडेंना राज्यसभेची उमेदवारी मिळण्यास कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे बिहारमधूनच आहेत.
दरम्यान, मागील काही दिवस रामदास आठवले यांच्या उमेदवारीबाबत मात्र उलटसूलट चर्चा होत्या. त्यांना उमेवाारी मिळणार की नाही, याबाबत संभ्रम व्यक्त केला जात होता. मात्र, त्यांच्या मागे उभी असलेली आंबेडकरी चळवळीची ताकद पाहता भाजपने त्यांना सलग तिसर्यांदा संधी देण्यात मागेपुढे पाहिले नाही. आठवलेच्या रुपाने भाजपने बौद्ध समजाला जवळ करण्योच राजकारण सुरू केले होते. त्याला आता यश मिळताना दिसत असल्याची चर्चा आहे.



Comments