top of page

अमेरिका- इराण युद्ध थांबलं; पाकिस्तान चीनची मध्यस्थी ?

Apr 8
2 min read

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर आज थांबलं आहे.अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष अखेर थांबला असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी देखील एक्सवर पोस्ट करून वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदन जारी करत अराघची यांनी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्यात आल्याचे मान्य केले आहे.


अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यात चीन आणि पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचं बोललं जात आहे. तसेच इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेकडे एक सविस्तर प्रस्ताव पाठवला आहे. जो आता अमेरिकन बाजू वाटाघाटीसाठी पुढे करणार आहेत. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली असून 10 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू होईल. इराण आणि अमेरिका यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर आता भारताकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकउून अमेरिका- इराण शस्त्रसंधीचे स्वागत करण्यात आले आहे.


अमेरिका-इराण शस्त्रसंधीचे भारतकाडून स्वागत करण्यता आले आहे. शस्त्रसंधीमुळं आखातात आता शांतता राहील, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच होर्मुझमधील वाहतूक पूर्ववत होईल अशी अशा आहे. आधीच युद्धामुळं खूप नुकसान झालं आहे. युद्धामुळं जगावर इंधनाचं संकट आलं आहे, असं भारताने म्हटलं आहे. चर्चा आणि कूटनितीनेच समस्यांवर तोडगा शक्य असल्याचंही भारताने म्हटलं आहे.


दरम्यान, ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे , मी दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणवरील बॉम्बहल्ले आणि हल्ले थांबवण्यास सहमत आहे. हा द्विपक्षीय युद्धविराम असेल. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या माझ्या चर्चेनुसार आणि त्यांच्या विनंतीनुसार, मी आज रात्री इराणकडे पाठवण्यात येणारी विनाशकारी लष्करी शक्ती थांबवत आहे, परंतु अट अशी आहे की इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितपणे उघडण्यास सहमती दर्शवावी. हे करण्यामागचे कारण असे आहे की, आम्ही सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच पूर्ण केली आहेत आणि त्याहूनही पुढे गेलो आहोत, आणि आम्ही इराणसोबत दिर्घकालीन शांततेसाठी आणि मध्य-पूर्वेतील शांततेसाठी एका ठेास कराराच्या अगदी जवळ आहोत. मला इराणकडून 10-कलमी प्रस्ताव मिळाला आहे. आणि आमचा विश्वास आहे की वाटाघाटींसाठी हा एक व्यवहार्य आधार आहे. असंही सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले आहे.

Comments


bottom of page