जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगूल वाजले, दोन टप्यात निवडणुकां पहिल्या टप्प्यात 12 जिल्हापरिषदा 125 पंचायतसमित्यांचा समावेश
- Navnath Yewale
- Jan 13
- 2 min read

मुंबई: महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक अयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी येत्या 5 फेब्रूवारी रेाजी मतदान होऊन 7 फेब्रूवारी रोजी निकाल लागणार आहे.
गेल्या महिन्यातच (डिसेंबर 2025) महाराष्ट्रात विविध नगरपालिकांसाठी मतदान होऊन निवडणुका झाल्या. आता दोनच दिवसात राज्यातील महानगरपालिकांतील मतदान होत आहे. त्यामुळे या निवडणुकीमुळे शहरांमधील राजकीय वातावरण तापलेले असतानाच गावा-गावांमध्ये निवडणुकांचं वारं वाहू लागणार आहे. या टप्प्यात केवळ 12 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत, उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांबाबत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यानंतर तारीख जाहीर करणार असल्याची माहिती आयोगानं दिली.
या जिल्हा परिषदांचा समावेश :
राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक अयोगानं दिली आहे ज्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर, परभणी या जिल्हा परिषदांचा समावेश आहे.
दरम्यान या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशी दोन मतं द्यावी लाणार आहेत. निवडणुकीत ज्या जागा राखीव आहेत त्या जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे. जल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणुक अयोग 1 जुलै 2025 ची मतदार यादीचा अवलंब करणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं असून याची अंतिम यादी 3 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेली आहे.
दरम्यान निवडणुकीचा प्रचार जिल्हा परिषद अधिनियमानुसर 24 तास आधी संपणार असल्याचंही जाहिर करण्यात आलं आहे. या 12 जिल्हापरिषद निवडणुकीसाठी 25 हजार 482 मतदान केंद्र असणार आहेत. त्यानुसार एकून 2.09 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यातील 1.02 कोटी महिला मतदार आहेत. 12 जिल्हापरिषदांसाठी 431 सदस्य निवडून द्यायचे आहेत.
पंचायत समिती निवडणुक: जिल्हा परिषदांसोबतच 125 पंचायत समित्यांसाठी 1462 सदस्यांची निवडणूक घेण्यात येईल. त्यातील 431 जागा महिलांसाठी, 166 जागा अनुसूचति जातींसाठी आणि 38 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असतील. मागास प्रवर्गासाठी 342 जागा राखीव असतील.
निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्यापासून संबंधित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
संबंधित क्षेत्रात ही आचारसंहिता लागू झाली असली तरी अन्य ठिकाणीदेखील संबंधित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. परंतु नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. राज्य निवडणुक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल.
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावे लागते. त्यामुळे एका मतदाराने दोन मते देणे अपेक्षित असते.
ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र:
नगरपरिषदा आणि नगपंचायतींच्या निवडणुकांच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र व शपथपत्रे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांची मागणी लक्षता घेऊन या निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात पारंपारिक पद्धतीने म्हणजे ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे स्वीकारण्यात आली. त्यानंतर महानगर पालिका निवडणुकीतही ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आले होते. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही आता ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील.



Comments