झेडपी निवडणुकीत ईव्हिएम मशिन धाब्यावर! सोलापूरच्या मोहोळमधील प्रकार; प्रशासनाचा मशिन ‘राखीव’ असल्याचा खुलासा
- Navnath Yewale
- 1 day ago
- 1 min read

सोलापूर : सोलापूरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर ईव्हिएम मशिन थेट हॉटेलवर सापडल्या. मतदान झाल्यानंतर चक्क हॉटेलवर ईव्हिएम सापल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातारण निर्माण झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर ज्या ईव्हिएम मशिन स्ट्राँग रुममध्ये असायला हव्या होत्या, त्या हॉटेलबाहेर सापडल्यानं ईव्हिएमध्ये हेराफेरी करण्यासाठीच मशिन तिथे आणल्या का? असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. अधिकार्यांच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी पोलिसांसह घटनास्थळाची पाहाणी केली. या ईव्हिएम मशिनमध्ये मतदान झालेले नाही. त्या राखीव असल्याची माहिती होळकर यांनी दिली आहे.
दरम्यान, कुरुल गटात भाजपचे सचिन जाधव आणि राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांच्यात चुरशीची लढत आहे. अशा अटीतटीच्या सामन्यात ईव्हिएम रस्त्यावर सापडल्यानं मतदारांच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली. सध्या या दोन्ही ईव्हीएम मशिन्स मोहोळच्या स्ट्राँग रुममध्ये सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने या ईव्हिएम मशिन्स ‘राखीव’ असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी मतदानाच्या दिवशी इतका बेजबाबदारपणा कसा? असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या ‘राखीव मशिनचा’ खुलासा विरोधकांच्या पचनी पडलेला नाही. याआधीच महापालिका निवडणुक दरम्यान विरोधकांनी मतदारयाद्यांमधील घोळ आणि ईव्हिएमवर संशय घेत सत्ताधार्यांविरुद्ध रान उठवलं होतं. त्यात मोहोळमधील या घटनेची भर पडली आहे. आता कुरुल गटात काय निकाल लागतोय? आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



Comments